अर्थसंकल्पीय अधिवेशनात मिळणार गृहनिर्माण संस्थांना न्याय

हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ठाणे: गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनात पारित केलेल्या सर्व ठरावांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, त्या-त्या विभागांच्या बैठका घेऊन निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांच्या विविध मागण्यांबाबत विचार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले, अशी माहिती ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सीताराम राणे यांनी विधान परिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्यासह भेट घेतली. यावेळी ठाण्यात प्रथमच अशा प्रकारे गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन आयोजित केल्याबद्दल अभिनंदन करून फडणवीस यांनी सीताराम राणे यांच्या १ जानेवारी रोजीच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिष्टचिंतन केले.

सहकार विभाग आणि ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात नुकतेच गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन पार पडले. या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुरध्वनीच्या माध्यमातून हजारोच्या जनसमुदायाशी ऑडियो संवाद साधला होता. यावेळी त्यांनी, गृहनिर्माण संस्थांचे पुर्नविकास तसेच स्वयंपुर्नविकास यासह इतर छोट्या मोठया अडचणी सोडवण्याचे जाहिर वचन दिले होते. या अनुषंगाने, सीताराम राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी महाअधिवेशनात पारित झालेल्या ठरावांच्या गोषवाऱ्यासह सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मागण्यांचा विस्तृत अहवाल श्री. राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अधिनियम १५४ ब मध्ये सुधारणा करण्यासह स्वयंपुर्ण पुर्नविकासाबाबत २०१९ च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करून लवकरच जिल्हा महासंघांना अधिसुचित करण्यात येईल. असे स्पष्ट केले.

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाळीव प्राण्यांविषयीच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी, या विषयाशी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून या विषयीची नियमावली करण्याबाबत विचार केला जाईल. त्याचबरोबर, गृहनिर्माण संस्थांच्या इतर विविध प्रश्न व ठरावांसंदर्भात सहकार व गृहनिर्माण खात्यासह त्या-त्या विभागाची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वस्त केले.