रुग्णालयाकडून तीन लाखांचा धनादेश
उल्हासनगर: महानगरपालिकेने हस्तांतरित केलेल्या झिरो कॅश काऊंटर सुपर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या राजू धाटावकर याने सोमवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. सहा महिन्यापासून हॉस्पिटल प्रशासनाने पगार दिला नसल्याने राजूने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप राजूच्या परिवाराने केला होता.
हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने डॉ.संचित पॉल यांनी हा आरोप फेटाळला असून राजूने कर्जापोटी आत्महत्त्या केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. माणूसकीच्या दृष्टीने राजूच्या कुटुंबियांना तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आल्याचे डॉ.संचित पॉल यांनी सांगितले.
कोविडच्या कालावधीत उल्हासनगर महानगरपालिकेने म्हारळच्या हद्दीत हे हॉस्पिटल उभारले होते. पण कोविड आटोक्यात आल्याने जवळपास दोन वर्ष हे हॉस्पिटल धूळ खात पडले होते. आयुक्त अजीज शेख यांनी पदभार हाती घेतल्यावर त्यांनी हे हॉस्पिटल प्लॅटिनम हॉस्पिटलचे डॉ.संजीत पॉल यांच्याकडे हस्तांतरित करून त्याचे रूपांतर सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डॉ.पॉल यांनी या हॉस्पिटलचा कायापालट केल्यावर फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा झाला होता.
याच हॉस्पिटलचे कायापालट करण्याचे काम सुरू असताना राजू धाटावकर याला गणपती मंदिराची देखरेख आणि पूजाअर्चा करण्याचे काम देण्यात आले होते. पुढे त्याची सुरक्षारक्षक पदावर नेमणूक करण्यात आली. त्याच्या खात्यात पगार पाठवण्यात येत होता. पण काही दिवसांपासून तो कामावर येत नसल्याने त्याला हॉस्पिटलमधून अनेकदा फोन करण्यात आले. राजूने आत्महत्या केल्याची बातमी कळल्यावर त्याने कर्जापोटी आणि कर्ज मागणारे हॉस्पिटलमध्ये येतील या भीतीने त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला अशी माहिती समोर येत असून पोलिसांनी त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी देखील डॉ.संचित पॉल यांनी केली.
राजू धाटावकर हा चांगल्या स्वभावाचा होता. त्याने कर्जाविषयी सांगितले असते तर त्याला सहकार्य केले असते. आज तो हयात नसल्याने त्याच्या कुटुंबियांना तीन लाख रुपयांचा धनादेश दिल्याचे डॉ.संचित पॉल म्हणाले.