गृह आणि वाहन कर्जाचे हप्ते वाढणार नाहीत

रेपो रेटमध्ये बदल नाही

नवी दिल्ली : आरबीआयने आपले नवे पतधोरण जाहीर केलं आहे. यावेळीदेखील आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सध्या रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम असेल. त्यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जात कोणतीही वाढ किंवा घट होणार नाही.

गुरुवारी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे जाहीर केले. शक्तिकांत दास यांनी रेपो रेटविषयक सविस्तर माहिती दिली आहे. चलनविषक धोरण समितीच्या सहापैकी चार सदस्यांनी रेपो रेटमध्ये कोणताही बदल करू नये असे सुचवल्याची माहिती दास यांनी दिली. दास यांनी रेपो रेटविषयी घोषणा करताना जागतिक संकटांवरही भाष्य केलं. आरबीआयने एसडीएफ 6.25टक्के, एमएसएफ 6.75टक्के तसेच रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

याआधी गेल्या महिन्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटच्या दरावर भाष्य केलं होतं. सध्याची आर्थिक परिस्थिती आणि महागाई दर लक्षात घेता व्याज दरात कपात करण्याबाबात सध्याच निर्णय घेणे थोडे घाईचे ठरेल. भारतासह सध्या संपूर्ण जगात आर्थिक पातळीवर अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत व्याजदराच्या कपातीबाबत सध्याच चर्चा करणे योग्य नाही. आरबीआयने महागाई दर चार टक्क्यांपर्यंत ठेवण्याचे लक्ष्य निश्चित केलेले आहे. तर प्रत्यक्ष मात्र महागाई दर पाच टक्क्यांपेक्षा पुढे गेलेला आहे, असे तेव्हा शक्तिकांत दास म्हणाले होते.

रेपो रेटमध्ये बदल झाल्यास घर, वाहन तसेच अन्य कर्जाच्या हप्त्यांत बदल होतो. यावेळी आरबीआयने रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळी गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच अन्य प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार नाही किंवा घटही होणार नाही.