ठाणे: एचएमपीव्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. हा एक हंगामी रोग असून तो सामान्यतः फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. कळवा रुग्णालयात १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्डही तयार करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
सध्या चीनमध्ये एचएमपीव्ही साथीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. भारतातही काही रुग्ण आढळले आहेत. मात्र, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. तो श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी रोग असून तो सामान्यतः फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या विषाणूबाबत, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार, २०२३च्या तुलनेत डिसेंबर-२०२४ मध्ये या आराजाच्या रुग्णात कोणतीही वाढ झालेली नाही. तरीही, खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करु नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे.
खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेंटीलेशन) राहील, याची दक्षता घ्या.काहीही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हस्तांदोलन करणे, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे, नागरिकांनी या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.