हिरानंदानी इस्टेट परिसर श्रीराममय

ठाणे: बोलो सियावर रामचंद्र की जय… जय श्री राम… च्या गजरात आणि मंगलमय वातावरणात हिरानंदानी इस्टेट परिसरात भव्य शोभायात्रा आणि कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेत भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह असंख्य रामसेवक सहभागी झाले होते.

वाद्यांचा गजर आणि मंगलमय वातावरणात भगवे झेंडे घेत रामभक्तांनी श्री रामाचा जप करीत जल्लोष केला. या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या भागातील संपूर्ण वातावरण `राममय’ झाले होते. कलशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये लगबग सुरू होती. या दर्शनाने भाविकांची मने तृप्त झाली.
प्रभू श्री रामाची मूर्तींबरोबरच बालकलाकारांनी रामायणातील पात्रांची वेशभूषा करीत भाविकांचे लक्ष वेधून घेतले. हिरानंदानी इस्टेटमध्ये अवतरलेला श्रीराम दरबाराच्या दर्शनाने भाविकांना गहिवरून आले. अखेर श्री गणेश मंदिरात महाआरती करून शोभायात्रेची समाप्ती करण्यात आली.

या यात्रेत माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, माजी नगरसेवक संदिप लेले, जिल्हा सरचिटणीस विलास साठे आदींसह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.