जीवात जीव असेपर्यंत पक्षाचे काम करत राहणार

अजित पवार यांचा शंका कुशंकांवर पडदा

मुंबई: कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचे काम होत आहे. बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत आणि पक्षातच राहणार आहोत असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार भाजपाच्या संपर्कात, राष्ट्रवादीचे ४०हून जास्त आमदार सोबत असल्याच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. श्री पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सुरू असलेल्या सर्व चर्चांवर पडदा टाकला. ते म्हणाले, सर्वत्र माझ्याबाबत चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. इतर राजकीय पक्षाचे नेते याबाबत बोलत आहेत. मात्र मी त्याबाबत बोलणार नसल्याचे अजित पवार म्हणाले. जीवात जीव आहे तोपर्यंत पक्षाचे काम करत राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक चढउतार आले आहेत. सध्या येत असलेल्या बातम्यांमध्ये यत्किंचितही तथ्य नाही. मला कामासाठी आमदार भेटले. यामधून वेगळा अर्थ काढू नका, असेही अजित पवार म्हणाले. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे हे प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का? असा सवालही आज अजित पवार यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत प्रत्येक पक्षाचे दोन लोक बोलणार असे ठरले आहे. त्यादिवशी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात पण बोलले नाहीत. त्यांना कोणीही याबाबत विचारले नसल्याचे अजित पवार म्हणाले. आम्ही नागपूरमध्ये ठरवले होते की, तिथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनिल देशमुख बोलणार आहेत. छत्रपती संभाजीनंगरमध्ये मी आणि धनंजय मुंडे बोललो. आता 1 मे ला मुंबईत महाविकास आघाडीची सभा होत आहे. त्या सभेत कोण बोलणार ते देखील आम्ही ठरवू असे अजित पवार म्हणाले.