रुग्णालयाच्या आरक्षित भुखंडावर फेरीवाल्यांचे बस्तान

नवी मुंबई : शहराची निर्मिती करत असताना सिडकोने स्माजिक सुविधांसाठी अनेक भुखंड आरक्षित ठेवले आहे. मात्र असे भुखंड सुरक्षित ठेवण्यात पालिकेला सपशेल अपयश आले असून यातील बहुतांश भूखंडावर अवैध इमारती बांधण्यात आल्या आहेत तर काही भूखंडावर फेरीवाल्यांनी बस्तान बसवले आहे. अशीच परिस्थिती घणसोलीमध्ये आहे.

घणसोली येथील सेक्टर-७ मध्ये रुग्णालयासाठी आरक्षित असणार्‍या भुखंडावर भाजी विक्रेत्यांनी विनापरवाना बस्तान बसवले आहे. पालिकेने आरक्षित केलेल्या अनेक भुखंडावर सध्या फेरीवाल्यांनी डोळा ठेवला आहे. घणसोलीत या भुखंडावर भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या भुखंडावर लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या आणि गेट हा गंजल्याने काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यातच या ठिकाणी रस्त्यावर बसणार्‍या भाजी विक्रेत्यांनी या मैदानावर अतिक्रमण केले आहे. गेट तोडून भाजी विक्रेत्यांनी शिरकाव केला आहे. भाजी विक्रेते, कांदा-बटाटा विक्रेत्यांनी मागील काही महिन्यांपासून विनापरवाना व्यवसाय सुरु केला आहे. पालिकेने आरक्षित केलेल्या भुखंडावर अतिक्रमण करुन हा भुखंड गिळंकृत करण्याचा डाव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घणसोलीतील अतिक्रमणपथक इतर ठिकाणी रस्त्यावर बसलेल्या फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करते, मात्र आरक्षित भुखंडावर अतिक्रमण त्यांच्या निदर्शनास आले नाही का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करीत कारवाईची मागणी केली आहे.

महापालिकेच्या भुखंडावर अतिक्रमण केल्या बाबत पाहणी करण्यात येईल. अतिक्रमण पथकाकडून या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. घणसोली विभागात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा पदपथ फेरीवाले, भाजी विक्रेत्यांनी केल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असे विभाग अधिकारी संजय तायडे यांनी सांगितले.