मिहीर शहाला फाशी द्या; ठाण्यात उबाठा पक्षाचे आंदोलन

ठाणे : कावेरी नाखवा कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे, वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नाखवा यांना चिरडणाऱ्या मिहीर शहाला फाशी द्या, अशी जोरदार मागणी करत ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आंदोलन केले.

वरळीमध्ये भल्या पहाटे बेदरकारपणे गाडी चालवून कावेरी नाखवा या महिलेला चिरडण्यात आले. आरोपी मिहीर शहा हा शिंदे गटाचा पालघरचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांचा मुलगा असल्याने तब्बल ६० तासानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत म्हणून मंत्र्यांनी पोलिसांवर राजकीय दबाव टाकून शोधकार्य करण्यास विलंब लावून मोठे षडयंत्र रचले असल्याचा आरोप यावेळी महिला शिवसैनिकांनी केला. मुंबई पोलीस सराईत गुन्हेगाराला तात्काळ पकडू शकतात तर या मुजोर मिहीर शहाला पकडण्याकरिता तीन दिवस का लागले? यासाठी कोणत्या राजकीय बड्या नेत्याचा दबाव होता? हे महाराष्ट्रासमोर आलेच पाहिजे या मागणीचे निवेदन महिला आघाडीने जिल्हाधिकारी यांनी दिले.

अशा गुन्हेगारीची पुनरावृत्ती होऊ नये व हा खटला फास्टट्रॅक वरती चालवून मानवरुपी राक्षस प्रवृत्तीच्या मिहीर शहाला फाशीच झाली पाहिजे. तसेच शहा कुटुंबीयांच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीने आपल्या निवेदनात केली आहे. यावेळी जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, उप जिल्हा संघटक ॲड. आकांक्षा आत्माराम राणे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.