हलव्याच्या दागिन्यांनी बाजारपेठ सजली

ठाणे : मकर संक्रांतीच्या तिळाच्या लाडूसोबतच या सणाची खासियत म्हणजे ‘हलव्याचे दागिने’. या दिवशी हलव्याचे सुंदर दागिने घालण्याची पद्धत आहे. हलव्याचे दागिने घालण्याची ही पद्धत पारंपरिक असून या वर्षी ठाण्यातील बाजारपेठेत या दागिन्यांचे भरपूर प्रकार पाहायला मिळत आहेत.

काळ कितीही आधुनिक असो पण काही परंपरा अजूनही जपल्या जातात. किंबहुना सोशल मीडियामुळे हलव्याचे दागिन्यांचे क्रेझ अजूनच वाढत आहे. मकर संक्रांती या सणात नववधू किंवा लहान बाळाची पहिली संक्रांत म्हणून त्यांना हलव्याचे दागिने घालून संक्रांत साजरी करण्याची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने साजरी होत आहे. संक्रांतीच्या निमित्ताने घरत आलेल्या नवीन सुनेचं आणि जावयाचं किंवा नवजात बाळाचे कोडकौतुक म्हणून त्यांना हलव्याचे दागिने घालून हा सण थाटामाटात साजरा केला जातो. लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला नवविवाहितेसाठी आणि नवजात बाळासाठी काळ्या रंगाचे वस्त्र खरेदी केले जातात.

दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते विविध पदार्थांपासून बनविले जातात. या दागिन्यांमध्ये दोन प्रकारचा हलवा वापरला जातो. साधा हलवा आणि काटेरी हलवा. काटेरी हलव्याचे माळलेले दागिने हे झिग लावलेले असतात, आणि साध्या हलव्याचे दागिने हे पुठ्ठ्यावर चिटकवलेले असतात. यामध्ये खसखस, तीळ, शेंगदाणे, साबुदाणा, मुरमुरे, तांदूळ, वेलदोडे, साखर फुटाणे आदी पदार्थ कलात्मक पद्धतीने उपयोगात आणले जातात. हे दागिने दिवाळीपासून बनवायला सुरु केले जातात तर मुंबई, आणि पुणे येथून हे दागिने विक्रीसाठी ठाण्यात आणले जातात.

संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत या दागिन्यांना मागणी असते. हलव्याच्या दागिन्यांमध्ये मिनी सेट हे २५० रुपये पासून ते ५०० पर्यंत आहे तर फुल सेट ४०० पासून ते १००० पर्यंत आहेत. तसेच बाळांच्या सेटमध्ये कृष्णा सेट १०० असून ते ३०० रुपयेपर्यंत आहेत तर राधा सेट २५० पासून सुरु आहे. यात नववधूसाठी बांगड्या, कानातले, बाजूबंद, मांगटिका, हार, अंगठी, मंगळसूत्र, कंबरपट्टा तयार केला जातो. जावयासाठी घड्याळ, हात, अंगठी, ब्रेसलेट असे अलंकार तयार केले जातात.

यावर्षी या दागिन्यांमध्ये नवीन डिझाइन्समध्ये उपलब्ध आहेत. हलव्याचे नक्षीदार नेकलेस, पाटल्या मेखला, श्रीफळ, मुकुट, मोहनमाळ, लोंबते कानातले, चिंचपेटी, बोरमाळ, नथ, गजरा, पैंजण देखील पाहायला मिळतात व मोबाईल, पेन, टाय पिन देखील सामील झाले आहेत.