काय आज गुजरात जायंट्स दिल्ली कॅपिटल्सवर मात करून गुणतालिकेत खाते उघडेल?

गुजरात जायंट्स हा वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) च्या या हंगामातील एकमेव संघ आहे ज्याने त्यांच्या तीन सामन्यांमध्ये एकही विजय नोंदवला नाही. बेंगळुरूच्या एम. चिन्नासवानी स्टेडियमवर रविवारी दिल्ली कॅपिटल्सशी सामना होत असताना, त्यांना त्यांचे 100% देण्या पलीकडे दुसरे गत्यंतर नाही. गुणतालिकेत त्यांचे खाते कधी उघडेल याची गुजरात जायंट्स आतुरतेने वाट बघत आहेत.

 

WPL मध्ये आमने सामने

गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.

 

संघ

गुजरात जायंट्स: बेथ मुनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), वेदा कृष्णमूर्ती, फीबी लिचफील्ड, हरलीन देओल, ॲश्ले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा, तनुजा कंवर, कॅथरीन ब्राइस, लीआ ताहुहू, मेघना सिंग, लॉरा वोल्वार्ड, सायली सतघरे, मन्नत कश्यप, शबनम शकील, प्रिया मिश्रा, त्रिशा पूजिता, तरन्नुम पठाण

दिल्ली कॅपिटल्सशफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राधा यादव, शिखा पांडे, पूनम यादव, तीतस साधू, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, अश्विनी कुमारी, अपर्णा मोंडल, स्नेहा दीप्ती

 

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

फीबी लिचफिल्ड: गुजरात जायंट्सच्या या डावखुऱ्या मधल्या फळीतील फलंदाजाने यूपी वॉरियर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 26 चेंडूत 35 धावा करून तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. तिने आपल्या सुरेख खेळीत चार चौकार आणि एक षटकार ठोकला आणि चौथ्या विकेटसाठी ऍशले गार्डनरसोबत 52 धावांची भागीदारी केली.

लॉरा वोल्वार्ड: दक्षिण आफ्रिकेतील उजव्या हाताच्या सलामीवीराने गुजरात जायंट्ससाठी या हंगामात पहिला सामना खेळला. तिने 26 चेंडूंत 28 धावा केल्या, ज्यात चार चौकारांचा समावेश होता आणि तिने आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. तिने तिची सलामीची जोडीदार आणि कर्णधार बेथ मूनीसह 5.2 षटकात 40 धावा जमवल्या.

शफाली वर्मा: दिल्ली कॅपिटल्सच्या उजव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाने तिच्या मागील दोन सामन्यांमध्ये अर्धशतके ठोकली आहेत. पहिल्या सामन्यात मोठ्या धावसंख्येपासून वंचित राहिल्यानंतर, या 20 वर्षीय आक्रमक खेळाडूने जोरदार लढत दिली आहे.

मॅरिझान कॅप: स्पर्धेतील तिच्या तीन खेळांमध्ये तिने दोनदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. ती बॅट आणि चेंडूने लक्षणीय प्रदर्शन करत आहे. या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने दोन डावांत 48 धावा केल्या आहेत आणि तीन डावांत सहा विकेट्स घेतल्या आहेत.

 

खेळपट्टी

बॅट आणि चेंडूमधील रोमांचक लढतीसाठी परिस्थिती चांगली दिसते. खेळपट्टी थोडी धीमी असण्याची अपेक्षा आहे कारण तिच्यावर यापूर्वी या स्पर्धेतील काही सामने खेळले गेले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये जे बघितले त्याच्या विपरीत धावा करणे इतके सोपे नसेल. मात्र, आत्तापर्यंत घडल्याप्रमाणे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे दिसते.

 

हवामान

28% च्या ढगांच्या आच्छादनासह, संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरण असेल. तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअस असेल. पावसाची 1% शक्यता आहे. आर्द्रता सुमारे 36% असेल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: 3 मार्च 2024

वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता

स्थळ: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

प्रसारण: जिओ सिनेमा, स्पोर्ट्स 18