आजोबांच्या पायाची शस्त्रक्रिया केली आणि निघाली विठ्ठलाची मूर्ती

ठाणे : ठाण्यातील ७७ वर्षांच्या आजोबांचा पाय मागील चार महिन्यांपासून दुखत होता. एमआरआय चाचणीनंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया केली असता पायात चार सेंटिमीटर उंचीची विठ्ठलाची पितळी मूर्ती रुतलेली आढळली. ही मूर्ती तज्ञ डॉक्टरांनी यशस्वीपणे बाहेर काढली. घरात स्टुलावरून पडल्यानंतर ताम्हणाला जोडलेली ही मूर्ती त्यांच्या पायात घुसली असावी, असा अंदाज या आजोबांनी व्यक्त केला.

ठाण्यात राहणारे सदाशिव राणे (७७, नाव बदलून) हे आजोबा पायाच्या दुखण्याने त्रस्त झाले होते. त्यांना चालताना तळव्याला कमालीचा ठणका लागत असे. त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवले, परंतु त्यांच्या दुखण्याचे निदान झाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या पायाची एमआरआय चाचणी केली. त्यावेळी त्यांच्या पायात काही तरी वस्तू असल्याचे आढळले. खाजगी रुग्णालयात पायाची शस्त्रक्रिया करणे थोडे खर्चिक होते, त्यामुळे त्यांनी बरेच दिवस या दुखण्याकडे दुर्लक्ष केले. परंतु सिव्हिल रुग्णालयात उपचार चांगले होतात, हे ऐकून सदाशिव राणे यांना त्यांचे कुटुंबीय सिव्हिल रुग्णालयात घेऊन आले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या पायावर मंगळवारी यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि डॉक्टरांना आश्चर्याचा धक्काच बसला. पायात रुतलेली वस्तू ही चार सेमी उंचीची विठ्ठलाची मूर्ती असल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी ती मूर्ती यशस्वीपणे बाहेर काढली आहे.

चार महिन्यांपूर्वी सदाशिव राणे घरात पूजा करत होते. दरम्यान स्टुलावर चढले असता, त्याचा तोल जाऊन खाली पडले. त्यावेळी खाली ठेवलेल्या ताम्हणाची कडा लागून त्यातील मूर्ती पायात रुतली असावी, असा अंदाज राणे कुटुंबीय व्यक्त करत आहेत.

ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ममता आळसपूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अस्थी रोग तज्ज्ञ डॉ. विलास साळवे, भूल तज्ज्ञ डॉ. राजू झुरळे, डॉ. अश्विन शिंदे अणि वैद्यकीय सहाय्यकांनी अथक परिश्रम घेतले.