राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस
ठाणे : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेल्या उचाट शिक्षण संस्थेच्या ‘अॅस्पी चिल्ड्रन अकादमी’ शाळेतील विद्यार्थी दियान दिलीप गायकर आणि शुभम विजय पाटील यांनी 30 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसमध्ये सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत विविध देशांतून, राज्यांतून एकूण ६५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना मागे टाकून या दोघांनी दैदिप्यमान विजय प्राप्त केला. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गुजरात सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित केलेल्या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनात या दोघांचा वरचष्मा होता. अहमदाबाद सोला येथील एसएएल एज्युकेशन कॅम्पस आणि सायन्स सिटी येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेत भारतातील 28 राज्यातून आणि सौदी अरेबिया, कुवेत, कतार आदी आखाती देशांमधून 650 विद्यार्थी आणि ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, नंदुरबार, चंद्रपूर येथून 30 विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा अतिशय खडतर होती पण ‘गुजकोस्ट’ने भारतातील विविध राज्यांतील बाल वैज्ञानिकांना उत्तम अनुभव दिला. गुजरातमधील साबरमती आश्रम, अटल ब्रिज, स्टॅच्यू आॅफ युनिटी अशा विविध ठिकाणांना भेट देण्याचा अनुभव खूप छान होता आणि सायन्स सिटीलाही फेरफटका मारल्यामुळे विद्यार्थी आनंदित झाले होते.
‘काँग्रेस’मध्ये बाल वैज्ञानिकांसाठी सादरीकरणासह समांतर विविध विषयांवर विविध प्रकारची विज्ञान सत्रे (व्याख्याने) घेण्यात आली होती. शाळा आणि संस्थांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा गौरव केला आणि त्यांच्या जिल्ह्याचे आणि शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर फडकवले याविषयी कौतूकोद्गार व्यक्त केले.
ही स्पर्धा 27 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजिण्यात आली होती. शाळेचे मुख्याध्यापक उमेश महाडिक हे या स्पर्धेदरम्यान बाल वैज्ञानिकांसह वैयक्तिकरित्या उपस्थित होते. मार्गदर्शक शिक्षिका सोनाली ठाकरे यांनी हा प्रकल्प अधिक चांगला होण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली. शाळेत परतल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे शैक्षणिक व अन्य अनुभव इतर विद्यार्थ्यांना सांगितले.