‘त्या’ मृत पर्यटकांना शहिदाचा दर्जा तसेच वीर पत्नींना शौर्य पुरस्कार द्या

माजी खासदार राजन विचारे यांची केंद्र सरकारकडे मागणी

ठाणे: जम्मू कश्मीरमधील पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील हिंदू पर्यटकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांना शहिदाचा दर्जा तसेच वीर पत्नींना शौर्य पुरस्कार प्रदान करावा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जम्मू-कश्मीरमधील पेहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये एकूण २७ पर्यटकांना ठार मारण्यात आले. या हल्ल्यात २० जण जखमी झाले आहेत. त्या मृतांपैकी सहा जण महाराष्ट्रातील डोंबिवली, पुणे व पनवेलमधील होते. या घटनेने संपूर्ण भारत देश हादरला. ही हत्या एवढी क्रूर होती की दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबासमोर त्यांची हत्या केली. ते आपला धर्मही लपवू शकले असते, परंतु त्यांनी आपला हिंदू धर्म सांगण्याचे धाडस करून आपल्या जीवाचे त्यांनी बलिदान दिले असल्याचे राजन विचारे यांनी पत्रात म्हंटले आहे.

ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत राज्य शासनाने करावी, कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी उचलावी आणि घरातील एका सदस्याला शासकीय नोकरीत रुजू करावे, अशी मागणी विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली आहे.