पाचव्या मजल्यावरून पडून मुलीचा मृत्यू

बदलापूर : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मजुराच्या चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली.

बदलापूर पूर्वेकडील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात साई वेदांत नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. काम करणारे सगळे मजूर याच इमारतीत आपल्या कुटुंबासमवेत राहतात. अशाच एका कष्टकरी मजुराची चार वर्षीय चिमुकली तिच्या इतर सहकारी मुलांसोबत पाचव्या मजल्यावर खेळत होती. खेळता-खेळता मुलीचा तोल जाऊन ती पाचव्या मजल्यावरुन खाली पडली. यावेळी ही मुलगी तोंडावर पडून, खाली बांधकाम सुरू असणाऱ्या दगडांवर कोसळली. यात तिच्या चेहऱ्याला आणि शरीराला मोठ्या जखमा झाल्या.

वेळीच मुलीला उपचार मिळावेत यासाठी जवळील दोन खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी गेले असता, मुलीची प्रकृती गंभीर असल्याने, तिला पुढे घेऊन जाण्यास सांगण्यात आल्याचे, प्रत्यक्षदर्शी आणि मदत करणाऱ्या काही नागरिकांनी सांगितले. यावेळी मुलगी मूर्च्छित अवस्थेत असल्याने, पुढे सरकारी इस्पितळात नेताना मरण पावली.