विजयहीन गुजरात जायंट्ससमोर “रॉयल” आव्हान

वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला, बुधवारी, त्यांचा चौथा विजय नोंदवता येण्याची दाट शक्यता आहे कारण ते गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर असलेल्या गुजरात जायंट्सचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर करणार आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सोमवारी यूपी वॉरियर्सवर 23 धावांनी विजय मिळवत त्यांचा बंगलोर दौरा शानदार प्रकारे पूर्ण केला. दुसरीकडे, गेल्या सत्राप्रमाणेच गुजरात जायंट्स सर्व प्रकारच्या अडचणीत सापडले असून त्यांनी अद्याप विजयाची गोड चव चाखली नाही.

 

WPL मध्ये आमने सामने

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात जायंट्स यांनी एकमेकांविरुद्ध तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दोन आणि गुजरात जायंट्सने एक जिंकला आहे. या हंगामात त्यांची एकदा भेट झाली आहे, ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने गुजरात जायंट्सला आठ गडी राखून पराभूत केले.

 

संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसोफी डिव्हाईन, स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (यष्टीरक्षक), जॉर्जिया वेरेहॅम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका सिंग ठाकूर, शुद्रा, शुभा सतीश, इंद्राणी रॉय, श्रद्धा पोखरकर, दिशा कासट, नदीन डी क्लर्क, केट क्रॉस, एकता बिष्ट 

गुजरात जायंट्स: बेथ मुनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), वेदा कृष्णमूर्ती, फीबी लिचफील्ड, हरलीन देओल, ॲश्ले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा, तनुजा कंवर, कॅथरीन ब्राइस, लीआ ताहुहू, मेघना सिंग, लॉरा वोल्वार्ड, सायली सतघरे, मन्नत कश्यप, शबनम शकील, प्रिया मिश्रा, त्रिशा पूजिता, तरन्नुम पठाण

 

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

स्मृती मानधना: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या कर्णधाराने यूपी वॉरियर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या. या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने 50 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 80 धावा केल्या. तिच्या शानदार फलंदाजीमुळे तिने सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

एलिस पेरी: ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने यूपी वॉरियर्सविरुद्धच्या तिच्या शेवटच्या सामन्यात मधल्या फळीत बॅटने महत्त्वपूर्ण योगदान दिले. या उजव्या हाताच्या फलंदाजाने 37 चेंडूंत चार चौकार आणि तेवढ्याच षटकारांसह 58 धावा केल्या. तिच्या फलंदाजीसोबतच ती चेंडूने ही उपयुक्त ठरू शकते.

ॲश्ले गार्डनर: गुजरात जायंट्सची ही उजव्या हाताची मधल्या फळीतील फलंदाज दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत एकमेव योद्धा होता. तिने 31 चेंडूंत सर्वाधिक 40 धावा केल्या, ज्यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तिने ऑफ-स्पिन  गोलंदाजी करून चार षटके टाकली आणि 37 धावा देऊन दोन गडी बाद केले.

मेघना सिंग: गुजरात जायंट्सची ही उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तिच्या संघासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाज होती. तिने चार षटकांत 37 धावा देऊन चार गडी बाद केले. पॉवरप्लेमध्ये आणि त्याचबरोबर मधल्या आणि अंतिम षटकांमध्ये तिने चांगली गोलंदाजी केली.

 

खेळपट्टी

फलंदाजीसाठी चांगल्या परिस्थितीची अपेक्षा करा. धावांची मेजवानी असण्याची दाट शक्यता आहे. तथापि, थंड आणि ढगाळ वातावरण वेगवान गोलंदाजांना मदत करू शकते. नवीन चेंडूने वेगवान गोलंदाज फलंदाजांना अनेक प्रश्न विचारू शकतात.

 

हवामान

41% ढगांच्या आच्छादनामुळे संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरण असेल. 1% पाऊस पडण्याची शक्यता आहे. सुमारे 16 अंश सेल्सिअस तापमानासह हवामान थंड राहील. आर्द्रता 39% असेल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: 6 मार्च 2024

वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता

स्थळ: अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

प्रसारण: जिओ सिनेमा, स्पोर्ट्स 18