गृहनिर्माण संस्थांना दिशा देण्यासाठी महाअधिवेशन गरजेचे – आ. संजय केळकर

गृहनिर्माण संस्थांच्या तीन दिवसीय महाअधिवेशनाला सुरुवात

ठाणे : शहरांमधील वाढत्या नागरीकरणासोबतच गृहसंकुले वाढत असल्याने गृहनिर्माण संस्थाचे प्रश्न देखील वाढत आहेत. तेव्हा, गृहनिर्माण संस्थांना दिशा देण्यासाठी अशा प्रकारचे महाअधिवेशन गरजेचे आहे, असे प्रतिपादन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केले. ही एक प्रकारची कार्यशाळा असून याद्वारे गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींचे प्रबोधन होणार असल्याचेही ते म्हणाले.

सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानात २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन व प्रदर्शन आयोजित केले आहे. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या पुढाकाराने ठाण्यात प्रथमच होत असलेल्या महाअधिवेशनातील प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (२७ डिसें. रोजी) आ.संजय केळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी, राज्याचे नूतन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे, परिवहन सदस्य विकास पाटील, संचालक हिंदुराव गळवे, शैलजा गस्ते, संतोष साळुंखे, विनोद देसाई आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर साधेपणाने महाअधिवेशनातील प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक आ. केळकर यांनी, ठाण्यात प्रथमच होत असलेल्या या महाअधिवेशनात तज्ञमंडळीचे मार्गदर्शन, पुर्नविकास तसेच स्वयं पुर्नविकासासंबंधी भूमिका विस्तृतपणे मांडली जाणार असल्याने हाऊसिंग फेडरेशनच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयामधे अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हा उपनिबंधक डॉ. मांडे यांनीही हाऊसिंग अदालतनंतर महाअधिवेशन व प्रदर्शन यासारखे जनहिताचे उपक्रम राबवणारी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन पहिलीच संस्था असल्याचे कौतुकोद्गार काढले. आयोजक सीताराम राणे यांनी, सोसायटीचे कामकाज करताना गृहनिर्माण संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. याशिवाय भेडसावणाऱ्या अन्य समस्यावर अशा प्रकारच्या अधिवेशनामध्ये विस्तृत चर्चा व ठराव करणार असल्याचे स्पष्ट केले. महाअधिवेशनातील प्रदर्शनात गृहनिर्माण संस्थासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसाह्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर सोलर वीज निर्मिती, रेन वॉटर हॉर्वेस्टींग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांच्या ५६ स्टॉल्सना उपस्थित पाहुण्यांनी भेट देत माहिती घेतली.

सोलर पॅनेल-चार्जींग स्टेशनसाठी सोसायट्यांना निधी देणार – ना. सरनाईक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भविष्याचा वेध घेऊन त्यांच्या मनातील पर्यावरणपूरक भारत उभारत आहेत. याची सुरुवात ई वाहनांपासून केली असल्याने भविष्य हे ईलेक्ट्रीक वाहनांचे आहे. त्यामुळे भविष्यात सोसायट्यांमध्ये ईलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढणार आहे. यासाठी आमदार निधी अथवा अन्य निधीतून सोसायट्यांमध्ये सोलर पॅनेल आणि चार्जींग स्टेशन उभारण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.