डोंबिवली : रविवारी रात्री देवीचापाडा गोपीनाथ चौक येथे एका रिक्षा चालकावर एका गर्दुल्ल्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे.
जगदीश म्हात्रे असे रिक्षा चालकाचे नाव आहे. ते गोपीनाथ चौकातील सद्गुरू दर्शन सोसायटीत राहतात. माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे ते नातेवाईक आहेत. रविवारी रात्री वाढत्या उष्णतेमुळे जगदीश म्हात्रे घराच्या बाहेर बसले होते. त्यावेळी रात्रीच्या वेळेत सद्गुरू दर्शन सोसायटी लगतच्या भरत भोईर नाल्याच्या कट्ट्यावर, काही जण नाल्या जवळील झाडाखाली चरस-गांजा यांचे सेवन करत बसले होते. काही जण मद्यपान करत टोळक्याने बसले होते.
ही टोळकी मद्यसेवन करून या भागात आरडाओरड करत होती. रात्रीची वेळ झाली असल्याने लोकांना सोमवारी कामाला जायचे आहे. ओरडा करू नका असे रिक्षाचालक जगदीश म्हात्रे यांनी घराजवळून चाललेल्या गर्दुल्ल्यांना सांगितले. त्याचा राग एका गर्दुल्ल्याला आला. त्याने काही क्षणात जगदीश म्हात्रे यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण करत हातामधील धारदार स्टीलच्या कड्याचा वार रिक्षाचालक जगदीश यांच्या नाकावर केला. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागले. त्यानंतर दुसरा वार हल्लेखोराने रिक्षा चालकाच्या डोळ्यावर करून गंभीर जखमी केले. त्यानंतर गर्दुल्ल्याने रिक्षा चालकाला जोराने जमिनीवर ढकलून देऊन हल्लेखोर पळून गेला.
विष्णुनगर पोलिसांना ही माहिती म्हात्रे यांनी दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी आले. हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी परिसरात घेतला पण ते या भागातून पळून गेले होते.
डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील देवीचापाडा, मोठागाव, गणेशनगर उल्हास खाडी किनारा भागात गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत गर्दुल्ले, चरस-गांजा सेवन करणारे, मद्यपी यांची वर्दळ वाढली आहे. या भागातील झाडे, झुडपे, मोकळ्या मैदानांचा आधार घेऊन ही मंडळी पोलिसांचा धाक नसल्याने बिनधास्त नागरिकांना उपद्रव देत आहेत.
विष्णुनगर पोलिसांनी रात्रीच्या वेळेत खाडी किनारची झुडपे, झाडे परिसरात गस्त घातली तर गांजा सेवन करणारे, मद्यपी टोळकी सापडण्याची शक्यता रहिवाशांकडून वर्तवली जात आहे. रिक्षा चालकावर हल्ला झाल्याने रिक्षा चालक संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे.