सोनसाखळी चोरांची टोळी जेरबंद

* ७० गुन्ह्यांची दिली कबुली
* ५१ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

ठाणे : ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरात सोनसाखळी, मोबाईल, दुचाकी आणि चारचाकी चोरट्यांना कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या चौकडीने थोडे थोडके नाही तर तब्बल ७० गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

तौफिक हुसेन (२९), कालिचरण झवेरी अली (३६), अब्बास जाफरी (२७) आणि सुरज उर्फ छोटया साळुंखे सर्व रा.आंबिवली अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिह जाधव यांनी या गुन्ह्यांची माहिती दिली.

ठाणे जिल्ह्यातील भिंवडी, ठाणे, बदलापुर, अंबरनाथ तसेच कल्याण, शिळ डायघर परिसरातील महिला व पुरूषांच्या गळयातील जबरीने सोन्याचे मंगळसुत्र, चैन खेचुन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना कल्याण क्राईम ब्रांचने अटक केली आहे.

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असतांना या गुन्हयातील व ठाणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील संशयित इसम हे कल्याणजवळील आंबिवली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आंबिवली परिसरातील इराणी वस्तीमध्ये सापळा लावुन सशंयित इसम तौफीक हुसेन, मोहम्मद अली उर्फ कालीचरण झवेरी अली, अब्बास जाफरी आणि सुरज उर्फ छोटया मनोज सांळूखे यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात चेन स्नॅचिंगचे ४० गुन्हे, मोबाईल चोरीचे २४ गुन्हे, वाहन चोरीचे ६ गुन्हे असे एकुण ७० गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून त्यांनी चेन स्नॅचिंग करून बोरो केलेला एकुण ५१ तोळे (५१० ग्रॅम) वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने, २४ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल फोन तसेच सहा मोटार सायकल, एक मारूती स्विफ्ट कार असा एकुण ५० लाख १८ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकुण ७० गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. मोबाईल चोरी व वाहन चोरीचे गुन्हे कोणकोणत्या ठिकाणी केले आहेत याचा तपास सुरू आहे.

ही कामगिरी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहायक पोलीस निरिक्षक संतोष उगलमुगले, पोलीस उप निरिक्षक विनोद पाटील, पोलीस अमलंदार दत्ताराम भोसले, विलास कडु, अनुप कामत, प्रशांत वानखेडे, गोरखनाथ पोटे, किशोर पाटील, उल्हास खंडारे, अदिक जाधव, सचिन वानखेडे, दिपक महाजन, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, विनोद चन्ने, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, रविंद्र लांडगे, महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना कुंभारे, मिनाक्षी खेडेकर, मंगल गावित यांनी केली आहे.