भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची पोलिसांकडे तक्रार
ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन व नौपाडा परिसरात बोगस प्लेसमेंट कंपन्यांनी बेरोजगारांच्या फसवणुकीचा ट्रॅप लावला असून, दररोज शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींची किमान ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंत फसवणूक केली जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी रेल्वे स्टेशनच्या परिसरात फलक लावून तरुणांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. तसेच नौपाडा पोलिसांना कठोर कारवाईची विनंती केली आहे.
ठाणे रेल्वे स्थानक व नौपाड्यातील काही इमारतींमध्ये अनेक बोगस कंपन्यांनी तात्पुरती कार्यालये थाटली आहेत. त्यात मोठ्या संख्येने ठाणे शहराबाहेरील तरुण-तरुणी येत आहेत. त्यांना बड्या बॅंका, मोठी हॉटेल आणि मोठ्या कंपन्यांची नावे सांगून नोकरीचे मृगजळ उभे केले जाते. त्यानंतर त्यांच्याकडून नोंदणी शुल्क किंवा डिपॉझिट म्हणून ३ ते ५ हजार रुपये उकळले जातात. मात्र, नोकरी देण्यासाठी टोलवाटोलवी केली जाते. तर काही वेळा तरुणाने बॅंकेत लिपिकाच्या नोकरीला पसंती दिली असल्यास, सुरक्षा रक्षकाची किंवा हेल्परची नोकरी दिली जाते. शिपाई पदाची नोकरी हवी असल्यास सफाई कामगार म्हणून नोकरी दिली जाते. मात्र, काही कंपन्यांच्या एच. आर. अधिकाऱ्यांबरोबर संधान बांधून तरुण-तरुणींना मानसिक त्रास व कष्टाचे काम करून घेतले जाते. या प्रकाराला कंटाळून मुले नोकरी सोडून निघून जातात. ते परत पैसे मागण्यासाठी आल्यानंतर नोकरी दिली असल्याचे सांगितले जाते. अन्यथा, बाऊन्सर्सकडून दमबाजी केली जात आहे.
या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गंभीर दखल घेऊन बोगस प्लेसमेंट कंपन्या बंद कराव्यात, अशी मागणी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केली आहे. तसेच या प्रकाराची कामगार विभागानेही दखल घेऊन फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करावी, अशी मागणी श्री. वाघुले यांनी केली आहे.