विटाव्यातून पिता-पुत्रांना अटक
ठाणे: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, दर महिना नऊ टक्के व्याज देतो आणि मागणीनुसार मूळ रक्कमही परत करू, असे आमिष दाखवत अनेकांची लाखोंची आर्थिक फसवणूक करणाऱ्या विटावा येथील पिता-पुत्रांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात दोषारोपत्रही दाखल करण्यात आले आहे. मात्र इतर आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे तक्रारदारांनी आयुक्तांना दिले आहे.
प्रथम मोकाशी आणि त्याचे वडील संजय मोकाशी अशी अटक आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराने कळवा पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार प्रथम याने कळवा भागातील एका परिचयातील व्यावसायिकाशी संपर्क साधून दिवा कोळीवाडा, ऐरोली येथील स्मार्ट मनी कन्सल्टन्सी या कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. या कंपनीमार्फत शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास महिना नऊ ते दहा टक्के व्याज मिळते, शिवाय नंतर मूळ रक्कमही परत मिळते असे सांगून पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. कंपनीशी लेखी करार करून प्रथम याने तक्रारदार आणि त्याच्या आईकडून लाखो रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली. सुरवातीला तक्रारदाराच्या आईला काही महिने मासिक व्याज दिले, परंतु त्यानंतर दोघांना व्याज देणे बंद केले.
तक्रारदाराचे फोन उचलणे बंद केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी प्रथम आणि त्याचे वडील संजय मोकाशी यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपींनी अशा अनेकांना आमिषे दाखवून कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून त्याची संपूर्ण चौकशी व्हावी तसेच या प्रकरणातील इतर आरोपींना देखील अटक करण्यात यावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान दोन्ही आरोपी अटकेत असून न्यायालयात दोषारोप पत्रही दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.