ऑनलाईन टास्क जॉबच्या आमिषाने अडीच लाखांची फसवणूक

ठाणे : ऑनलाईन फसवणुकीचे सत्र सुरूच असून राबोडी परिसरात राहणाऱ्या 58 वर्षीय महिलेची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

राबोडी येथे राहणाऱ्या 58 वर्षीय योगा टीचर असलेल्या महिलेस 2 ते 6 जुलै 2024 या काळात मोबाईलवर एक मेसेज आला होता. या मॅसेजमध्ये आम्ही ऑनलाईन पार्टटाइम जॉब देतो अशी बतावणी केली होती. ऑनलाईन मेसेज करून व गुगल रिव्हयु टास्क सोडवून दिवसाला तीन ते चार हजार रुपये मिळवा असे देखील त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. तक्रारदार महिलेने हे काम करण्याची इच्छा दर्शवली. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या मोबाईलवर लिंक व मेसेज पाठवून त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील केले. त्यानंतर वेळोवेळी तक्रारदार यांच्या बँक खात्यातून 2 लाख 62 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतर कुठलाही जॉब न देता फोन बंद केले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी राबोडी पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.