ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार
ठाणे : मुंब्रा विकास आघाडी तसेच राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांच्यासह चार नगरसेवकही बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
श्री. जगदाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही अधिकृत घोषणा केली असून येत्या रविवारी हा पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांसह ठाणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती दिवंगत सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यांचाही शिंदे गटात प्रवेश होणार असून ठाण्यात हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
ठाण्यात राष्ट्रवादीची मोडतोड करण्याची व्यूहरचना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने आखली आहे. त्यानुसार आता पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीचे चार माजी नगरसेवक यामध्ये हणमंत जगदाळे, राधाबाई जाधवर, दिंगबर ठाकुर, वनिता घोंगरे आदींसह परिवहनचे माजी सदस्य संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, माजी नगरसेवक संभाजी पंडीत, युवा पदाधिकारी प्रशांत जाधवर, राजेंद्र देशमुख,संदीप घोगरे आदींसह इतर पदाधिकारी रविवारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. लोकमान्य नगर लक्ष्मीपार्क येथे सांयकाळी 6 वाजता हा प्रवेश होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: हजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जगदाळे यांच्यासह येथील ब्लॉक अध्यक्ष, युवक अध्यक्ष, महिला पदाधिकारी यांनी देखील राष्ट्रवादीचे घडय़ाळ हातून काढल्याने लोकमान्य नगर भागात आता राष्ट्रवादी पुर्ती कमकुवत झाल्याचे दिसत आहे.
मागील दोन महिन्यापूर्वी दिवंगत सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात होता. त्यानुसार त्यांच्या परिसरात भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश निश्चित झाला होता. परंतु प्रवेशाच्या काही क्षण आधी हा प्रवेश लांबणीवर गेला. मात्र आता सुलेखा चव्हाण यांचा देखील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात याच दिवशी प्रवेश होणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून एकीकडे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता हणमंत जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे चार नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत असल्याने ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
हणमंत जगदाळे राष्ट्रवादी सोडणार हे निश्चित मानले जात होते. मात्र प्रवेशाची तारीख निश्चित नव्हती. आता मात्र येत्या १२ फेब्रुवारी रोजी हा प्रवेश निश्चित झाला असून आपण हा प्रवेश का करीत आहोत, यासाठी त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. ४० ते ४५ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत सामाजिक जीवनात काम करीत असतांना, सुरवातीला कॉंग्रेस आणि त्यानंतर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत काम केले आहे. परंतु ही वाटचाल करीत असतांना माझी वैचारीक कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्याची माहिती श्रेष्ठींकडे देखील दिली आहे. त्यानुसार तुमचा स्वाभीमानी सेवक कोणापुढे झुकणार नाही, हे देखील त्यांनी सांगितले होते. संयम पाळला, मात्र आता संयमाचा बांध फुटला आहे. मी जग जिंकले नाही, मात्र जनमत मिळविले आहे. त्याच जनमताच्या खातर लोकमान्य, शास्त्री नगर भागाचा विकास करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही पक्ष सोडत असतांना मी कोणाला दोष देणार नसल्याचे त्यांनी यात नमुद केले आहे.
क्लस्टरसाठीच पक्षाला सोडचिठ्ठी
लोकमान्य नगरचा विकास व्हावा या उद्देशाने मागील दोन वर्षापासून काय करायचे यावर चर्चा सुरु होत्या. परंतु या भागाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी दुसरा पर्याय नसल्यानेच दोष देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.