पालिका मुख्यालयावरुन उडी मारण्याचा माजी आमदाराचा इशारा

उत्तन येथील कत्तलखाना रद्द करण्याची मागणी

भाईंदर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाईंदरच्या उत्तन येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या कत्तलखान्यास भाजपने विरोध केला आहे. हा निर्णय मंगळवारपर्यंत मागे न घेतल्यास महापालिकेच्या मुख्यालयावरून उडी मारणार असल्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.

उत्तन येथील शासकीय जागेवर ४० कोटी रुपये खर्चून कत्तलखाना उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या कत्तलखान्यास भाजपने विरोध केला आहे. या संदर्भात रविवारी माजी आमदार नरेंद्र मेहता व जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध केला. कत्तलखाना उभारण्याचा निर्णय इतक्या झटपट पद्धतीने घेण्यात आला असल्यामुळे त्यातील निविदा प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे.

शहराला गरज नसताना नागरिकांच्या माथी हा कत्तलखाना लादला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय येत्या मंगळवारपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करून पालिका मुख्यालयावरुन उडी मारणार असल्याचा इशारा माजी आ. नरेंद्र मेहता यांनी दिला.