गिल्बर्ट मेंडोंसासह माजी नगरसेवक शिंदे गटात

भाईंदर: शिवसेना (शिंदे गट) पक्षात भाईंदरचे प्रथम आमदार गिल्बर्ट मेंडोंसा व माजी शिवसेना (उबाठा गट) नगरसेवकांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ह्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

भाईंदर उत्तन परिसरातील माजी नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे शिवसेना (उबाठा गट) पक्षाला जोरदार गळती लागली असल्याचे दिसून येत आहे. मीरा-भाईंदर महापालिका २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरात माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांच्या नेतृत्वाखाली चारही शिवसेना नगरसेवकांनी विजयी होऊन गड राखला होता.

भाजपाचे बहुसंख्य नगरसेवक निवडून आले असतानाही शिवसेनेशी एकनिष्ठ राहून उत्तन परिसरात शिवसेना नगरसेवकांनी मुसंडी मारली होती. मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांसह मीरा-भाईंदरचे प्रथम आमदार गिल्बर्ट मेंडोंसा, माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक बर्नाड डिमेलो, माजी नगरसेवक गोविंद जॉर्जी ह्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश लवकरच पार पडणार आहे.