उपमुख्यमंत्र्यांसह रसिक झाले मंत्रमुग्ध
ठाणे: लोकगायिका मैथिली ठाकूर हिच्या सुमधुर आवाजातील गाणी ऐकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल दोन तास मंत्रमुग्ध होऊन तल्लीन झाल्याचे चित्र काल उपवन महोत्सवात पाहण्यास मिळाले.
प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग आयोजित उपवन महोत्सवाचा काल सांगता सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. शेवटच्या दिवशी बिहार येथील लोकगयिका मैथिली ठाकूर आणि भावंडांचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तुकडोजी महाराज यांचे गीत तसेच मराठी अभंग, कानडा राजा पंढरीचा अशी भक्तीगीते गाऊन तिने साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले. श्री राम आणि सीता यांच्या विवाह प्रसंगावर आधारित गीतही तिने गायले. त्यावर अनेक महिलांचे पाय थिरकले. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शिवस्तोत्र या गीताची फर्माईश केली होती तसेच दमादम मस्त कलंदर या गाण्याने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
यावेळी खा. श्रीकांत शिंदे यांनी मैथिली ठाकूर यांना अंबरनाथ येथील शिव फेस्टिव्हलकरिता आमंत्रित केले तर ठाण्यातील रसिक हे दर्दी असल्याने पुढील वर्षी देखील कार्यक्रमाकरिता आमंत्रित करा,अशी विनंती मैथिली ठाकूर यांनी आयोजक श्री. सरनाईक यांना केली.
या सांगता सोहळ्यास आयोजक आ. प्रताप सरनाईक, खा. श्रीकांत शिंदे, आ. निरंजन डावखरे, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्यासह महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि नगरसेवक उपस्थित होते. उपवन फेस्टिव्हलला चार दिवसांत लाखो ठाणेकरांनी भेट देऊन आनंद लुटला.