आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा दुसरा सामना १९९२ चा विश्वचषक विजेता पाकिस्तान आणि आपला पाचवा विश्वचषक खेळणारा संघ, नेदरलँड्स यांच्यात खेळला जाईल. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये ६ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे.
२०२३ मध्ये पाकिस्तान आणि नेदरलँड्सची एकदिवसीय कामगिरी
२०२३ मध्ये दोन्ही संघांची कामगिरी विरोधाभासी होती. पाकिस्तानने १६ एकदिवसीय सामने खेळले, १० विजय नोंदवले, तर नेदरलँड्सने १३ सामन्यांपैकी केवळ पाच जिंकले. या वर्षात हे दोन्ही देश पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहेत. एकूणच, पाकिस्तान आणि नेदरलँड्सने सहा वेळा एकमेकांशी भिडले आहे आणि पाकिस्तानने ते सहा च्या सहा सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.
फलंदाजीत, जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने १५ एकदिवसीय डावात ५० च्या सरासरीने आणि ८५ च्या स्ट्राईक रेटने ७४५ धावा केल्या. याशिवाय फखर जमान (६४४ धावा) ४६ च्या सरासरीने आणि ८६ चा स्ट्राईक रेट पाकिस्तानसाठी अभूतपूर्व फॉर्ममध्ये दिसत आहे. नेदरलँड्ससाठी, मॅक्सवेल ओ’डॉड (५०३ धावा) ३९ च्या सरासरीने आणि ७९ च्या स्ट्राईक रेटसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. अष्टपैलू बास डी लीडची नेदरलँड्ससाठी सर्वाधिक ४८ ची सरासरी असून त्याने सात एकदिवसीय सामन्यांमध्ये २८५ धावा केल्या आहेत.
गोलंदाजांमध्ये, उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ हा पाकिस्तानसाठी १३ सामन्यांमध्ये २४ विकेटसह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे, ज्यात दोन चार विकेट हॉल आणि एक फायफर यांचा समावेश आहे. डचसाठी पुन्हा एकदा बास डी लीड एक उपयुक्त खिलाडू म्हणून जाणला जातो. त्याने सात एकदिवसीय सामन्यांमध्ये १५ विकेट्ससह आपला कमाल दाखवला आहे.
वर्ल्ड कपमध्ये कसे राहिले आहे पाकिस्तान आणि नेदरलँड्सचे प्रदर्शन?
पाकिस्तानने १९७५ ते २०१९ दरम्यान ७९ विश्वचषक सामने खेळले आहेत. त्यापैकी पाकिस्तानने ४५ सामने जिंकून ५७% यश प्राप्त केले आहे. दुसरीकडे, नेदरलँड्सने १९९६ आणि २०११ दरम्यान पाच विश्वचषकात भाग घेतला आणि २० सामने खेळले. त्यापैकी फक्त दोन संमन्यांमध्ये नेदरलँड्सला विजय मिळाला आणि अशा प्रकारे केवळ १०% यश त्यांना ह्या महास्पर्धेत नोंदवता आला आहे. हे दोन संघ विश्वचषकात दोनदा आमनेसामने आले आहेत आणि दोन्ही वेळेला पाकिस्तान ने आपला वर्चस्व दाखवून दिला.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ सुरू होण्यापूर्वी सराव सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि नेदरलँड्स
पाकिस्तानने त्यांचे दोन्ही सराव सामने गमावले. ते न्यूझीलंडला पाच विकेट्सने पराभूत झाले आणि ऑस्ट्रेलियाकडून 14 धावांनी पराभव पत्करावा लागला. नेदरलँड्सला दुर्दैवाने मैदानावर पुरेसा वेळ मिळू शकला नाही कारण त्यांचे दोन्ही सामने पावसामुळे प्रभावित झाले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३ षटकांच्या सामन्यात ते १४.२ षटके फलंदाजी आणि २३ षटके गोलंदाजी करू शकले, परंतु भारताविरुद्धच्या सामन्यात, पावसामुळे सामना रद्द करण्यात आल्यामुळे त्यांना सराव करायची संधी मिळाली नही.
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स: संघ, खेळण्याची परिस्थिती, हवामान आणि कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायची गरज आहे
संघ
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.
नेदरलँड्स: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास दे लीड, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाईन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकर, शरीझ अहमद, सायब्रँड एंजेलब्रेक्ट.
खेळण्याची परिस्थिती
हैदराबादमध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल आणि दोन्ही संघ येथे प्रथमच खेळतील. या ठिकाणी २००५ पासून सात एकदिवसीय सामने आयोजित केले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी चार आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी तीन जिंकले आहेत. हे उच्च धावसंख्येचे मैदान आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २८८ आणि दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या २६३ आहे. बॅट आणि बॉलमध्ये चांगली स्पर्धा अपेक्षित आहे.
हवामान
हवामानात काही काळ ढग आणि काही काळ सूर्य दिसणे अपेक्षित आहे. दिवसभरात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन ५२% असेल आणि पावसाची शक्यता नाही. उत्तर-वायव्येकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायची गरज आहे?
पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आझमला जास्तीत जास्त वेळ मैदानावर राहण्याची गरज. संघाची फलंदाजी त्याच्याभोवती फिरेल अशी अपेक्षा आहे. या उजव्या हाताच्या शीर्ष फळीतील फलंदाजाने त्याच्या शेवटच्या १० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८ च्या सरासरीने आणि ८८ च्या स्ट्राइक रेटने ४२८ धावा केल्या आहेत. त्याच्याकडून संघाच्या संपूर्ण फलंदाजीची जबाबदारी घेणे अपेक्षित आहे. गोलंदाजांमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी पाकिस्तानसाठी एक्स-फॅक्टर खेळाडू ठरू शकतो. त्याची दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता चमत्कार घडवू शकते. आफ्रिदीने त्याच्या शेवटच्या १० एकदिवसीय सामन्यांमध्ये २० बळी घेतले आहेत.
नेदरलँडसाठी विक्रमजीत सिंग हा संघाच्या फलंदाजीत महत्त्वाची कडी असेल. पंजाबमध्ये जन्माला आलेल्या या २० वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने गेल्या १० एकदिवसीय सामन्यांमध्ये ३९ च्या सरासरीने आणि ८९ च्या स्ट्राइक रेटने ३९२ धावा केल्या आहेत. चेंडूसह, उजव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज लोगन व्हॅन बीक वर देखील लक्ष असेल. तो एक चांगला नवीन चेंडू गोलंदाज आहे, जो किफायतशीर गोलंदाजी करू शकतो. या ३३ वर्षीय खेळाडूने त्याच्या शेवटच्या आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: ६ ऑक्टोबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)