यश भैरे अबॅकस ऑलिम्पियाड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथम

ठाणे: वागळे इस्टेट येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या माध्यमिक विभागातील इ. ८ वी मध्ये शिकत असलेल्या यश भैरे या विद्यार्थ्याने एआयएमए-अबॅकस ऑलिम्पियाड आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०२४ (गट-फ) मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

रॅडीसन ब्लू, अंधेरी येथे आयोजित व २१ देशातील विविध वयोगटातील १७५ विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत यशला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एआयएमए (अबॅकस किंग), तैवानचे अध्यक्ष मास्टर रेक्स यांग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यशने अबॅकस स्पर्धेत जिद्द व चिकाटीच्या बळावर मागील वर्षी १० व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होण्यास तो पात्र झाला व एआयएमए-अबॅकस ऑलिम्पियाड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यानेप्रथम पारितोषिक पटकावले आहे. त्याच्या या कामगिरीने शाळेचा नावलौकिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सिल्वेस्टर डिसोझा यांनी तसेच विद्यालयाच्या प्राचार्या शिल्पा श्रीवास्तव यांनी यशचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.