ठाण्यात प्रथमच गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य उपस्थिती

ठाणे: गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्या व अडचणींबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील कोकणी पाडा, उपवन तलाव येथील मैदानातील भव्य मंडपात गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

२७ डिसेंबर रोजी आमदार संजय केळकर आणि आ. निरंजन डावखरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून दुसऱ्या दिवशी शनिवारी २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या महाअधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.

ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील हे महाअधिवेशन यापूर्वी जून महिन्यात होणार होते, मात्र, कोकण पदवीधर निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आले होते.

ठाण्यात प्रथमच होत असलेल्या या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रविंद्र चव्हाण तसेच, सहकार मंत्री, गृहनिर्माण मंत्री आदींसह राज्याचे सहकार आयुक्त अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

तीन दिवसांत सुमारे ३० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार असून यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. अधिवेशनामधील प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसाह्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर रेन वॉटर हॉर्वेस्टींग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स देखील असणार आहेत. अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.

पुर्नविकासासह विविध समस्यांची लागणार तड

या महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचा पुर्नविकास, त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी रखडलेले पुर्नविकास प्रकल्प, स्वयंपुर्ण विकासाच्या समस्या व स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसाह्य, सोसायटीत पाळीव प्राण्यांविषयी नियमावली, वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाईबाबत, गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्यात सुधारणा व आवश्यक ते बदल यासह गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या आणि अडचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्याचबरोबर, गृहनिर्माण संस्था संदर्भातील वेगवेगळे ठराव देखील या अधिवेशनात पारित केले जाणार आहेत.

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पहिल्याच महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी हाऊसिंग फेडरेशनने https://bit.ly/thanehousingmahaadhiveshan2024 ही लिंक उपलब्ध केली आहे. २६ डिसेंबरपर्यंत प्रतिनिधींनी प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे.