अग्निशमन दलाचा डोलारा जुन्या वाहनांवर
ठाणे : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या संपत्तीची काळजी घेणाऱ्या ठाणे अग्निशमन दलाच्या वाहनांची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. एखादी दुर्घटना घडल्यास ही वाहने घटनास्थळी कशी पोहचणार असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.
ठाणे अग्निशमन दलाची नऊ अग्निशमन केंद्रे असून सात केंद्रांवर सुमारे १८ ते २० वाहने आहेत. या वाहनांच्या खांद्यावर अग्निशमन दलाचा डोलारा आहे. या वाहनांपैकी अनेक वाहने १५ वर्षांहून जास्त जुनी आहेत त्यापैकीच जवाहर बाग अग्निशमन केंद्रात अग्निशमन दलाचा एक बंब उभा असून त्याचे अनेक भाग गंजलेले आहेत. तरीही जेव्हा-जेव्हा आगीची घटना घडते तेव्हा-तेव्हा हे वाहन कर्तव्यावर पाठवले जाते. अशावेळी रस्त्यावरच दुर्घटना होण्याची भीती अग्निशमन दलातील जवानांनी व्यक्त केली आहे.
गेले अनेक महिने हे वाहन रस्त्यावर उभे आहे. त्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्या ठाणेकरांचे लक्ष जात असून त्या वाहनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. याबाबत अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि जी वाहने १५ वर्षांपेक्षा जास्त वयोमानाची आहेत, ती वाहने टप्प्याटप्प्याने अग्निशमन दलातून बाद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जवाहर बाग येथिल बंब देखिल काही महिन्यांत बाद करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.