शहापूर : शहापूर तालुक्यात ६ जुलै रोजी भारंगी नदीला आलेला पूर हा नदीपात्रात केलेल्या अनधिकृत बांधकामामुळेच आला असल्याने येथील नागरिकांनी ७ जुलै रोजी दिवसभर वाहतूक अडवून या गोष्टीचा निषेध करत ठिय्या आंदोलन केले होते.
या पुरामध्ये अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहने वाहून गेली आहेत. गुजराथी बाग परिसरात अनेक ठिकाणी पाणी भरले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांच्या मालमत्तेचे तसेच वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी भारंगी नदीच्या पात्रात सार्वजनिक बांधकाम विभागाने अनधिकृत बांधकाम करून प्रशस्त असे उद्यान बांधल्याने या नदीचा प्रवाह निमुळता झाला आहे. या उद्यानाचे अतिक्रमण हटवल्यास भारंगी नदीचा प्रवाह बऱ्यापैकी सुरळीत होईल असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर त्याच्याच विरुद्ध दिशेला शहापूर नगरपंचायत हद्दीत नदीकिनारी बांधलेली संरक्षित भिंत ही संरक्षित भिंतीच्या पलीकडे वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षिततेची बाब असल्याचे येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे. संरक्षित भिंतीच्या पलीकडे हजारो नागरिकांचे वास्तव्य असून नगरपंचायतीने बांधलेली संरक्षक भिंत ही नागरिकांच्या फायद्याची असून देखील नदीप्रवाहाला अडसर ठरणारी नसल्याचे येथील जाणकारांचे म्हणणे आहे. परवा झालेल्या अतिवृष्टीमुळे शहापूर नगरपंचायतीने ठोस पावले उचलली असून भारंगी नदी पूर्वेकडील विकास काम प्रगती पथावर असलेल्या गणेश घाटावर नगरपंचायतीने बुलडोजर फिरवलेला आहे.
कळंभे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या भारंगी नदी उद्यान व गणेश घाट नगरपंचायत प्रशासनाने निष्कासित केल्यास भारंगी नदीचा पाणी प्रवाह नक्कीच मोकळा होईल असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी सोमवारी सकाळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त नागरिकांशी वार्तालाप केला. याशिवाय येथील नुकसानग्रस्त पीडितांना शासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी उपनेते प्रकाश पाटील यांनी दिले.