विधानसभा निवडणुकीचे पडघम; निवडणूक आयोग लागला कामाला

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ रोजी संपत असून मतदारयाद्या अपडेट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. २० ऑगस्टला याद्या कायम करण्यात येणार असून संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.

लोकसभा निवडणूक संपताच महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीची चाहूल लागू लागली आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्रासह चार राज्यांच्या निवडणुकांची तयारी करू लागल्याने ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापणार आहे.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, जम्मू-कश्मीर, हरियाणा, झारखंड या चारही राज्यांची व्होटर लिस्ट अपडेट करायला घेतली आहे. यामध्ये १ जुलै रोजी ज्या तरुण-तरुणींचे वय १८ वर्षे होणार आहे ते देखील मतदार नोंदणी करू शकणार आहेत. लोकसभेची यादी आहेच परंतु गेल्या सहा महिन्यांत ज्यांचे वय १८ वर्षे झाले आहे किंवा ज्यांची वय पूर्ण होऊनही नाव नोंदणी करायचे राहून गेले होते त्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी आहे.

बीएलओ घरोघरी जाऊन मतदाराचे स्थलांतर, मृत्यू आदी गोष्टी तपासणार आहेत. तसेच नाव नोंदणी राहिली असल्यास ती देखील केली जाणार आहे. ही अपडेट झालेली मतदार यादी २० ऑगस्टला ल़ॉक केली जाईल. या यादीच्या आधारे निवडणूक घेतली जाणार आहे.

हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर 2024 रोजी, झारखंडचा 26 नोव्हेंबर आणि महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये बऱ्याच काळानंतर निवडणूक होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी ३० सप्टेंबरपूर्वी विधानसभा निवडणुका घेणे बंधनकारक आहे. यामध्ये आयोग काही प्रमाणावर सूट मिळवू शकतो.