टोरंटकडून कळवा-मुंब्रावासींची पिळवणूक – आ. जितेंद्र आव्हाड

ठाणे : कळवा-मुंब्रा भागातील टोरंट वीज कंपनीच्या भरमसाठ वीज बिलामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले असून राज्य सरकारने या प्रश्नावर त्वरित तोडगा काढावा, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा या भागाचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात आ. आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा भागातील टोरंट कंपनीच्या कारभाराचा प्रश्न उपस्थित केला. २०१७ साली मागणी नसतानाही युती सरकारच्या काळात चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जामंत्री असताना कळवा-मुंब्रा भागातील वीज वितरण, वहन आणि वसुलीची कामे टोरंट कंपनीला देण्यात आली होती.
आज ही कंपनी सर्वसामान्य ग्राहकांना अक्षरशः लुटत असल्याचा आरोप आ. आव्हाड यांनी केला. एका घरात एक पंखा आणि एक विजेचा दिवा आहे, अशा ग्राहकाला महिन्याला चार हजार इतके देयक कंपनी पाठवत असून या भागातील ५०टक्के नागरिक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. ते इतके जास्तीचे बिल कसे देणार, असा सवाल आ. आव्हाड यांनी उपस्थित करून राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालावे, अशी सूचना केली.

मुख्यमंत्री यांनी मागील अधिवेशनात समिती स्थापन करून तोडगा काढू, असे अश्वासन दिले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही. या भागातील नागरिकांमध्ये टोरंट कंपनीबद्दल प्रचंड असंतोष असून वेळीच राज्य सरकारने लक्ष घालावे, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा आ.आव्हाड यांनी दिला आहे.