आव्हाडांकडून खळबळजनक ऑडीओ क्लिप पोस्ट

ठाणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटरवरून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे. त्यात अक्षय शिंदे एन्काऊंटर घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितलेले संभाषण असल्याचा दावा आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट करताना अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काउंटर म्हणून संबोधले जाते आहे, ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका…निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती असं सांगत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये दोन अज्ञात व्यक्ती संबंधित एन्काउंटरवर संवाद साधताना दिसतात. जेव्हा ही घटना घडली तेव्हा नेमकं काय झालं याबाबतचा मंब्रामधील एक युवक दावा करताना दिसतो.

या ऑडिओ क्लिपमध्ये दोन अज्ञात व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत. त्यात एक युवक समोरच्या व्यक्तीस सांगतो की, अक्षय शिंदेचा मर्डर जेव्हा झाला त्याच्यामागे माझीच गाडी होती. माझ्यामागे पोलीस लागतील म्हणून मी कुणालाही काही बोललो नाही. मी आणि माझा मेहुणा मुंब्रा बायपासवरून एका रॅलीला चाललो होतो. मुंब्रा डोंगर चढत असताना पोलिसांची व्हॅन आम्हाला ओव्हरटेक करत पुढे आली. त्या व्हॅनला पडदे लावले होते. तेव्हा गाडीत थक करून मोठा आवाज आला. आम्हाला वाटलं गाडीचे पाटा वाजला असावे, पुन्हा आवाज आला तेव्हा आम्ही घाबरलो. त्यानंतर त्यांनी व्हॅन थांबवली. दोन पोलिसवाले उतरले त्यांनी मागचा दरवाजा उघडला आणि पुन्हा बंद केला. त्यानंतर तिसरा आवाज आला. तेव्हा आम्ही तिथून पुढे निघून गेलो. ते कळव्याच्या दिशेने गेले आणि टी जंक्शनच्या बाजूने वळलो असं हा युवक सांगताना दिसतो.

तसेच आम्ही पुढे गेलो तेव्हा मोबाईलवर न्यूज वाचली, अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला. या ऑडिओत समोरचा व्यक्ती युवकाला घाबरण्याची गरज नाही असं सांगत असतो. रॅलीच्या वेळी पोलिसांनी अक्षय शिंदेला मारले असा युवक दावा करतो. वाय जंक्शनचा नवीन ब्रीज सुरू होतो तिथून पुढे झाल्याचं पोलीस सांगतायेत असं समोरील व्यक्ती युवकाला सांगतो. त्यावर तिथे नाही, तर फकिरशा बाबा दर्गापासून थोडे पुढे गेलो ना, तिथे थक करून आवाज आला. मुंब्राहून कळव्याच्या दिशेने येताना हे घडले. दर्गा पार केल्यानंतर पोलिसांनी आमच्या व्हॅनला ओव्हरटेक केले. हे पोलिसवाले गणवेशात नव्हते. सिव्हिल ड्रेसमध्ये होते. तीन आवाजानंतर ब्रीज जिथं संपतो, रेल्वे ट्रॅकजवळ ते थांबले. आम्ही येत असताना ते पाहिले. मात्र माझा मेहुणा बोलला, भाईजान इथून चल उगाच आपण अडकू. व्हॅनला काळे पडदे लावले होते, असा दावा युवकाने या संभाषणात केला.