धरण हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावा- सावर्डेकर
ठाणे: ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण मे महिन्यातही आटत नाही. हे धरण ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित केल्यास शहरातील पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊ शकते. काही वर्षांपूर्वी याबाबत मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत मनसेचे शहर सचिव प्रदीप सावर्डेकर यांनी व्यक्त केली आहे. शहरात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होण्याआधीच लाल फितीत अडकेलेल्या या धरणाच्या वापरास सुरूवात करावी, अशी मागणी सावर्डेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत सुरु नाही. काही भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या भागात पाण्याचे नियोजन बारगळले आहे. असे असताना दिघा येथील दुर्लक्षित धरणाकडे पावसाळी पिकनिक स्पॉट म्हणून पाहिले जात आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे कोणत्याही उपाययोजना राबवण्यात न आल्याने अपघाताची शक्यताही वाढली आहे. या धरणाबाबत योग्य निर्णय लवकरात लवकर घेण्याची मागणी सावर्डेकर यांनी केली आहे.
देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हाच्या रेल्वे इंजिनसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता होती. वर्षभर भरपूर पाणी मिळावे, यासाठी ब्रिटिशांनी नवी मुंबईमधील दिघा इलठणपाडा येथे १८.१० एकर जमिनीवर १८५ मीटर लांबीचे व आणि १४.९५ मीटर खोलीचे धरण बांधले.
नैसर्गिक जलस्रोत असल्यामुळे या धरणातील पाणी मे महिन्यातही आटत नाही. पण स्वातंत्र्यानंतर या धरणातील जलसाठ्याचा काहीच उपयोग करण्यात आलेला नाही. धरणामधील पाण्याचे वाटप आणि वापरावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू असतात. पण पाण्याचा वापरच न होणारे हे एकमेव धरण आहे.
मान्सून सुरू होताच राज्यातील सर्वात पहिले हेच धरण भरते. या धरणाच्या संरक्षण कठड्यावरून पाणी वाहत असते. मात्र फक्त हे दिख्याव्याचे धरण असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर या धरणासंदर्भात योग्य ते निर्णय घ्यावा अशी मागणी सावर्डेकर यांनी केली आहे.