मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, उद्वाहनाची (लिफ्ट) संख्या वाढविण्यात येत आहे. नव्या वर्षात सरकते जिने, उद््वाहनांच्या उभारणीच्या कामाला गती मिळणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर ही कामे हाती घेतली असून २०२७ पर्यंत मोठ्या संख्येने सरकते जिने, उद्वाहने प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
एमआरव्हीसीने २०२४ सालापर्यंत मुंबईतील विविध उपनगरीय रेल्वे स्थानकांवर १५ उद्वाहने आणि १६ सरकते जिने यशस्वीरित्या स्थापित केले. तर, २०२४ सालामध्ये चार नवीन उद्वाहने आणि नऊ सरकते जिने उभारले. प्रवाशांना सुरक्षित आणि अधिक सुलभ प्रवास सुनिश्चित करण्यासाठी २०२७ सालापर्यंत आणखी ११९ उद््वाहने आणि १८३ सरकते जिने बसवण्याची योजना आखली आहे. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरीय स्थानकांवर एकूण १३८ उद््वाहने आणि २०८ सरकते जिने उपलब्ध होतील.