महाराष्ट्रात कमी होणार वीज दर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली सरकारची योजना

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्याच्या ऊर्जा क्षेत्रासाठी पुढील २५ वर्षांची ब्लू प्रिंट तयार केली आहे. उद्योगांसह सर्वांना स्वस्त वीज उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. येत्या दोन ते तीन वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

नागपुरात ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी विविध योजनांतर्गत गरीबांना दिल्या जाणाऱ्या घरांमध्ये सौरऊर्जा सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचेही सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार आहे. मागील सरकारमध्येही त्यांच्याकडे हे मंत्रालय होतं. नागपुरात बोलताना त्यांनी ऊर्जा क्षेत्र अत्यंत महत्त्वाचं असून आम्ही पुढील २५ वर्षांची ब्लू प्रिंट तयार केली, असल्याची माहिती त्यांनी दिली.

गरिबांच्या घरांची बीलं माफ होणार
विविध सरकारी योजनांतर्गत गरिबांना दिल्या जाणाऱ्या घरांसाठी वीज बिल येऊ नये, अशी आमची योजना असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याशिवाय सिंचन क्षेत्राशी संबंधित प्रलंबित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावरही आपला भर असल्याचं ते म्हणाले.

भाजपचा कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री होणार, हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ठरवतील, असं फडणवीस म्हणाले. त्यांनी मला ज्या जिल्ह्यात लक्ष द्यायला सांगितले असेल, त्या ठिकाणी मी काम करेन, पण मला गडचिरोली जिल्ह्यात काम करायचे आहे. हा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा आहे. गेल्या काही वर्षांत तेथील परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. महाराष्ट्रातील नक्षलवाद आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

काँग्रेसने लोकांची दिशाभूल करण्यासाठी अमित शहा यांनी आंबेडकरांबाबत संसदेत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. भाजप आणि अमित शाह स्वप्नातही आंबेडकरांचा अपमान करू शकत नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.