ठाणे: मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या कमी करण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे, त्यामुळे ठाणे महापालिकेसह राज्यातील महापालिकांची प्रभाग संख्या कमी होऊन चार सदस्य पॅनेल पद्धतीने निवडणूक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन सदस्य पद्धतीने घेऊन प्रभागांची संख्या वाढवली होती. तीन सदस्य पद्धतीची प्रभाग रचना करून नागरिकांकडून हरकती सूचना देखील मागविण्यात आल्या होत्या तसेच प्रभागातील ओबीसी, महिला, अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण देखिल जाहीर करण्यात आले होते. आठ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय रद्द करून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका चार सदस्य पॅनेल पध्दतीने घेण्याचा आणि वाढवलेले प्रभाग कमी करण्याचा देखील ठराव मंजूर केला होता.
मुंबई महापालिकेतील प्रभाग कमी करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईतील नगरसेवक राजू पेडणेकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. काल न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली त्यामुळे त्या निर्णयाचा परिणाम राज्यातील ठाणे महापालिकेसह २७ महापालिकांवर होणार आहे. तेथे चार सदस्य पॅनेल पद्धतीने निवडणूक होण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेची २०१७ची निवडणूक चार सदस्य पॅनेल पद्धतीने झाली होती. त्यावेळी १३१ नगरसेवकांचे ३३ पॅनेल होते. महाविकास आघाडी सरकारने १४२ नगरसेवक असलेले तीन सदस्यांचे ४७ पॅनेल केले होते. ११ नगरसेवकांची संख्या वाढली होती, परंतु ही संख्या कमी होऊन ती १३१ होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.