देशाची स्थिती सुधारण्यासाठी महाआघाडीला निवडून आणा

भिवंडीत शरद पवार यांचा भाजपावर हल्लाबोल

भिवंडी : भाजपाला घटना बदलायची आहे म्हणून चारशेपेक्षा जास्त जागा पाहिजेत. राज्यातील शेतकरी व कष्टकरी संकटात आहे. अल्पसंख्यांकाची स्थिती बिकट आहे, त्यामुळे देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी महाआघाडीला निवडून आणले पाहिजे”,असे वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी भिवंडीतील सभेत केले.

भिवंडीतील लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा)म्हात्रे यांची प्रचार सभा आज शुक्रवार रोजी सायंकाळी भिवंडीतील पोगाव येथील मोकळ्या जागेत आयोजित केली होती. या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांच्या सोबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, जयंत पाटील, संजय सिंग, भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख, जितेंद्र आव्हाड आणि महेश तपासे आदी उपस्थित होते. या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत उमेदवार सुरेश (बाळ्या मामा)म्हात्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी तसेच स्थानिक पातळीवरील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना उबाठा, काँग्रेस, आरपीआय सेक्युलर आणि इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी देवावर विश्वास असल्याने माझी तुरुंगातून सुटका झाल्याचे सांगत त्यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. तसेच त्यांनी देशाला वाचविण्यासाठी आम्ही मतदारांकडून भीक मागण्यासाठी आपण आलो असून गरिबांना विविध सवलती दिल्या आणि त्यांच्यासाठी शाळा बांधल्या म्हणून मोदींनी मला जेलमध्ये टाकले असा आरोप केला. त्यांनी विरोधकांना जेलमध्ये टाकले आणि विविध प्रकारे त्रास दिला हे भित्र्याचे लक्षण आहे. मोदी जिंकले तर राज्यातील इतरांना देखील जेलमध्ये टाकतील,असा इशारा त्यांनी आपल्या भाषणातून दिला.