यकृतावरील आठ फोड काढून सुरतच्या रुग्णाला केले ठणठणीत

जिल्हा शासकीय रुग्णालयात यशस्वी उपचार

ठाणे : ‘अमिबिया’मुळे यकृतावर तब्बल आठ फोड आलेल्या सुरत येथील व्यवसायाने वाहन चालक असलेल्या रुग्णावर ‘सिव्हिल’मध्ये यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

गुजरातमधील सुरत शहरात वाहनचालक म्हणून काम करणारे शांताराम चव्हाण (30) यांच्या पोटात दुखू लागले होते. प्रारंभी सुरतमधील एका खाजगी रुग्णालयात शांताराम यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांच्यावर उपचार योग्य पद्धतीने होत नव्हते. त्यांची परिस्थिती सामान्य असल्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नव्हते. दरम्यान, ठाणे सिव्हिल रुग्णालयात चांगले उपचार होत असल्याचे त्यांना समजल्यानंतर ते सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले.

सिव्हिल रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम यांच्या सर्व तपासण्या केल्या असता त्यांच्या यकृतावर फोड झाले होते, अशी माहिती वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे यांनी दिली.

चव्हाण यांच्या यकृतावर आठ फोड आले होते. अशातच त्यांच्या छातीत पाणीही झाले होते. रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या छातीमधील पाणी काढून नंतर मोठ्या कौशल्याने आठ फोड काढून टाकले आहेत. १५ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना नुकतेच घरी सोडण्यात आले आहे.

त्यांच्यावर उपचार करणा-या वैद्यकीय पथकामध्ये वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. विश्वास वासनिक, डॉ. श्रीजीत शिंदे, डॉ. प्रतीक बिश्वास आदी होते.
रोग प्रतिकारक शक्ती कमी असणे, अशुद्ध पाणी, कच्ची भाजी अथवा बाहेरचे अन्न खाल्ल्यावर यकृतात फोड येण्याची शक्यता असते. सकस आहार, शुद्ध पाणी, भाजीपाला शिजवून खावे, असे आवाहन ‘सिव्हिल’चे वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे यांनी सर्वांना केले आहे.