वाशी एपीएमसी बाजारात इजिप्तचा कांदा दाखल

नवी मुंबई : मागील काही महिन्यांपासून वाशीतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक कमी होत असल्याने कांद्याचे दर वधारलेले आहेत. उत्तम दर्जाचा कांदा कमी असल्याने आणि पावसामुळे कांदा भिजल्याने उत्तम दर्जाच्या कांद्याची मागणी दर वाढत आहेत. त्यामुळे कांद्याची वाढती मागणी पाहता गुरुवारी बाजारात इजिप्तचा कांदा दाखल झाला आहे.

घाऊक बाजारात सध्या उच्चतम देशी कांदा ५० रुपये प्रती किलो तर इजिप्तचा कांदा ४२ रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे विदेशी कांद्यामुळे देशी कांद्याच्या दरावर अंकुश राहण्याची शक्यता आहे.

एपीएमसी बाजारात गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर चढेच होते. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कांद्याचे दर वाढलेले होते. मागील महिन्यात पडलेल्या पावसाने कांदा भिजला होता. त्यामुळे बाजारात ओला कांदा दाखल होत होता. यामध्ये निम्याहून अधिक कांदा खराब निघत आहे, तर चांगला कांदा कमी प्रमाणात आहे, त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली होती. या दोन महिन्यांच्या कालावधीत घाऊक बाजारात कांद्याने पन्नाशी गाठली आहे तर किरकोळीत ६०-७० रुपयांवर विक्री होत आहे.

कांद्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी इजिप्तचा कांदा दाखल झाला आहे.

गुरुवारी बाजारात इजिप्तचा २५ टन कांदा दाखल झाला असून प्रतिकिलो ४२ रुपयांनी विक्री होत आहे. इजिप्तचा कांदा हा आकाराने मोठा असून अधिक लालसर असतो तर देशी कांदा मध्यम आकाराचा व चवीचा असतो. इजिप्तच्या कांद्याला हॉटेल व्यवसायिक पसंती देतात. या कांद्याला जास्त उठाव नव्हता मात्र हॉटेल व्यवसायिकांनी कांदा आकाराने मोठा असल्याने खरेदी केला, अशी माहिती कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे.