तिप्पट झाली वाहनसंख्या

मुंबईतील खाजगी वाहनांची संख्या शहराच्या क्षमतेच्या तिप्पट झाली आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. 2023-24 ची आकडेवारी सादर करताना जी माहितीपुढे आली आहे ती थक्क करणारी तर आहेच, पण शहरातील डोकेदुखी ठरलेल्या अनेक समस्यांचे स्त्रोत दर्शविणारी आहे. मग ती पार्किंगची समस्या असो, वाहतूक कोंडी असो किंवा वाहतुकीतून उद्भवणारे संघर्षाचे क्षण असोत, या सर्वांमागे एक गोष्ट सुस्पष्ट होते आणि ती अशी की आपली यंत्रणा एवढ्या मोठ्या प्रमाणातील वाहनांचे नियंत्रण आणि नियोजन करु शकत नाही. रस्ते रुंद करुन झाले, उड्डाणपुलांचे पेव फुटले. नवनवीन लिंक शोधल्या, सागरी मार्गांची तजविज केली. इतकेच काय मेट्रो सेवा अंमलात आणली तरी मुंबईकरांच्या दैनंदिन यातायातीमधील यातना कमी होण्याचे नाव घेत नाही.
अनेक परदेशी शहरांमध्ये, विशेषत: गजबजलेल्या भागातील स्थिती आपल्याकडील अनेक चौक आणि उपनगरातील गल्लीबोळांपेक्षा वेगळी नाही. आम्ही स्वत: हे पॅरिसमध्ये अनुभवले तसे अलिकडे जपानमध्येही. एक मात्र खरे की तेथील वाहनचालकांच्या शिस्तीमुळे परिस्थिती हाताबाहेर जात नाही. पोलिस तर औषधालाही दिसत नाहीत. पादचार्‍यांना प्राधान्य हा सुवर्ण नियम काटेकोरपणे पाळला जातो. मुंबई-ठाणे-पुणे, कोणतेही शहर घ्या, वाहनचालकांमध्ये आपापसात विनाकारण स्पर्धा दिसते आणि सर्वात वाईट म्हणजे त्यास मगरुरीचा दर्प असतो. ठाण्यातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला तर परिस्थिती सुधारु शकते. परंंतु मुळातच जे संस्कार नाहीत ते कायद्याने अथवा दंडात्मक कारवाईने येतीलच कसे? हे संस्कार या राज्यातील जर वाहनचालक असेल तर शालेय जीवनात त्याच्यावर घडवता येतील. परंतु परप्रांतीय वाहनचालक त्यांच्या-त्यांच्या प्रांतातील बेशिस्त घेऊन अक्षरश: शिस्तीचे धिंडवडे काढतात.
परदेशातील एक बाब आपण अंमलात आणू शकू. ती म्हणजे ज्याला गाडी विकत घ्यायची आहे, त्याने सर्वप्रथम अर्ज करायचा, अर्जाच्या फॉर्ममध्ये त्याच्याकडे वाहन पार्क करण्याची जागा आहे काय याचा उल्लेख हवा. वाहतूक कोंडीचा अधिभार द्यावा लागेल. रस्त्यावर वाहन आणताना कार पुलिंगसारख्या योजनेत सहभागी होण्याची तयारी दर्शवायला हवी, आदी अटी लिहून घ्यायला हव्यात. त्यानंतर हा अर्ज सोडतीत नंबर लागेल तेव्हाच विचारात घेतला जावा, अशा पद्धतीने एक मार्ग काढता येऊ शकेल.
श्रीमंत होण्याची घाई आणि त्याच श्रीमंतीचे दर्शन जर तुम्ही खरेदी करीत असलेल्या गाडीने होत असेल तर मग वरील उपाय सरकारी फाईलीत बंदिस्तच रहाणार आहे, असो.