अर्धवट कामे

हवामान बदल सर्वच पालिकांच्या पथ्यावर पडले असे म्हणावे लागेल. हवामान खात्याचा अंदाज चुकतोच यावर समस्त पालिका अधिकार्‍यांचा ठाम विश्‍वास असल्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची कामे किंवा खोदून ठेवलेले रस्ते पूर्ववत करावे असे त्यांना खचितच वाटले नाही. उशिरा का होईना पाऊस सुरू झाला आहे आणि सर्वच पालिकांची अकार्यक्षमता आणि नियोजनातील ढिसाळपणा चव्हाट्यावर आला आहे. पुढील काही दिवस त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत राहतील आणि गणपती आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रकाशझोतात येतील! हे असे वर्षानुवर्षे का होत आहे याबाबत जबाबदार (?) मंडळी कधीच बोलताना दिसत नाहीत याचेही जनतेला राहून राहून आश्‍चर्य वाटत राहते.
जसे हवामान बदलामुळे ऋतुचक्रावर विपरित परिणाम झाला आहे, तसाच काहीसा प्रकार पालिकांच्या ‘सिस्टीम’ मध्ये घडला आहे. फरक इतकाच की पालिकांची ‘सिस्टिम’ हाडा-मासाची माणसे चालवत असतात तर हवामान ही पूर्णपणे नैसर्गिक आणि अदृश्य बाब आहे. त्यामुळे दोष कुणाला देता येत नाही. पालिकेच्या बाबतीत मात्र तसे होऊ शकत नाही. दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात पाऊस पडणार हे गृहीत धरून पालिकेच्या अधिकार्‍यांनी एक वेळापत्रक बनवण्याची गरज आहे. या वेळापत्रकानुसार प्रत्येक खाते कार्यरत आहे की नाही हे समजू शकते. जे मागे पडत आहेत त्यांनी अधिक कार्यक्षम राहून कामाला गती द्यायला हवी. परंतु फाईली हाताळणारे कधी तिच्या लालफितीचे गुण आत्मसात करतात हेच कळत नाही. आपली चूक झाकण्यासाठी कारणे शोधण्यात त्यांचा इतका वेळ जातो की प्रत्यक्ष कामाकडे दुर्लक्ष होऊ लागते! कधी ठेकेदारावर खापर फोडायचे, ठेकेदाराने देयक मिळत नाही म्हणून पालिकेला दोष द्यायचा, कधी परवानग्या वेळेत मिळाल्या नाहीत ही सबब सांगावी तर कधी अतिक्रमणांना पुढार्‍यांनीच अभय दिला अशी ओरड करायची. परंतु त्यामुळे होते काय तर नागरिक जीव सांभाळत या अर्धवट राहिलेल्या खड्ड्यांवरून चालत राहतात. वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त होतात तर सार्वजनिक बसेसच्या फेर्‍या रद्द होऊ लागल्यामुळे प्रवासीही मेटाकुटीला येतात. या सर्वांच्या शिव्याशापांचे धनी झालेली पालिका यंत्रणा हा मन:स्ताप का टाळत नाही? पालिकांमध्ये आर्थिक भ्रष्टाचार क्वचितच चव्हाट्यावर येतो कारण पुरावे नसतात आणि संबंधितांची मिलीभगत असते. परंतु अकार्यक्षमता हाही एक प्रकारचा भ्रष्टाचार असतो आणि शहरात जागोजागी त्याचे पुरावे त्याची साक्ष देत असतात. त्याचे काय, हा खरा प्रश्‍न आहे.