‘एन.डी.’ व्हावेत हीच इच्छा

आंदोलने, पुरोगामी चळवळ, विश्वासर्हता वगैरे बाबींचे ज्यांच्या नावाशी थोडी-थोडकी नव्हे तर सात दशके घट्ट नाळ जुळली होती, अशा एन.डी. पाटील यांचे निधन राज्याच्या सुसंस्कृत आणि प्रगल्भ राजकारणाचे न भरून येणारे नुकसान करून गेले आहे. येणारे काही दिवस त्यांच्या प्रदीर्घ योगदानाचा माध्यमे धांडोळा घेतील, परंतु एका प्रश्नाचे उत्तर या लेखांमध्ये सापडणे दुर्मिळ आहे. कै. एन.डी. यांचा सार्वजनिक जीवनातील वावर आणि त्यासाठी त्यांनी जपलेली प्रतिमा विद्यमान राजकारण्यांना साध्य होईल काय? हा तो प्रश्न आहे. राजकारणाचा पोत खालावत चालल्याबद्दलचा उद्घोष होत असून त्यावर काही सुधारणा करण्याचे प्रयत्न सांप्रत राजकारण्यांत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
एन.डी यांच्या सारखे नेतृत्त्व निर्माण होण्यात आणि टिकून राहण्यात असंख्य अडचणी आहेत आणि त्या स्विकारल्या जात असल्यामुळे असे नेते इतिहासाच्या अभ्यासक्रमात एका धड्यापुरते मर्यादित राहतील. त्यांचे अनुकरण करणे किंवा प्रेरणा घेऊन त्या मार्गाने चालणे या तर फार पुढच्या बाबी झाल्या. या नेत्यांना लाभलेल्या मोठेपणाची खूप मोठी किंमत त्यांनी मोजलेली असते. जनतेबद्दलचा आदर, प्रामाणिक कळकळ आणि प्रश्न सोडवण्यासाठी तत्त्वाशी एकनिष्ठता, जेवढा नेता मोठा तेवढे त्यांच्या वाट्याला येणारे मोहाचे क्षण खूप. पण त्यात बळी पडणे म्हणजे उपेक्षित आणि अन्यायग्रस्तांची प्रेरणा ठरेल. ही खूणगाठ एन.डी. यांच्या पिढीने आपल्या ध्येयाशक्तीशी घट्ट बांधली होती. असे नेते आता सापडणे कठिण आहे. ही अधोगती महाराष्ट्रात गेली तीन-चार दशकांपासून सुरू आहे. सत्तेसाठी वाट्टेल त्या थरावर जाणारे नेते एकेकाळी एन.डी. यांचे सहकारी होते. त्यामुळे आजच्या युवा नेत्यांवर पूर्णपणे खापर फोडणे उचित ठरणार नाही. राजकारणाला सत्ता आणि स्वार्थाची जोड मिळाल्यावर आणि भ्रष्टाचाराला सर्वमान्यता मिळाल्यावर आणखी काय होणार? सहकार चळवळ एकेकाळी ललामभूत होती. तिची सूत्रे भ्रष्टाचाराने बरबटलेल्या हातात आपण सोपवली आहे. जिथे नेते एकमेकांवर टीका करताना तोल जाणार नाही याची काळजी घेत तिथे सकाळ-संध्याकाळ लांच्छनास्पद विधाने होत आहेत, हिंसाचार तर नित्याचा झाला आहे. अशा परिस्थितीत एन.डी. यांसारखे नेते तयार होतील कसे आणि ते टिकून राहतील कसे हा प्रश्न आहे. एन.डी. यांच्या निधनामुळे हा प्रश्न तयार झाला आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला प्रमाणिकपणे जनतेच्या दरबारात नेण्यासाठी विश्वासार्हतेसारखा किंमती दागिना त्या नेत्याकडे असावा लागतो. असे नेते दुर्दैवाने शोधूनही सापडणार नाहीत आणि हेच खरे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. नेते क्षणिक राजकारणात गुरफटून गेले आहेत, अशा वेळी जे मूठभर एन.डी यांसारखे नेते खेडो-पाडी कार्यरत असतील त्यांच्या पाठीशी जनतेने उभे रहायला हवे. तीच महाराष्ट्र सेवा आणि खरी आदरांजली ठरेल.