शिक्षण खाते नापास !

राज्य शासनातर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणारे एक सर्वेक्षण अलिकडेच करण्यात आले होते. त्यातून निष्पन्न झालेल्या अहवालातील माहिती धक्कादायक होती. अनेक मुलांना वजा-बाकी आणि मोठ्या मुलांना गुणाकार-भागाकार करता येत नसल्याचे उघडकीस आले होते. जी शोचनीय अवस्था गणिताबद्दल होती तीच भाषाविषयी. सहावी-सातवीतील मुलांना एक वाक्य सलग वाचता येत नसल्याचे या पहाणीत आढळून आले होते. एकूणच जिल्हा परिषद शाळा असोत की महापालिका संचलित शाळा, तेथील शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. हेच हा अहवाल सांगून गेला. सरकारी (अनुदानित) शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हा अहवाल आठवायचे कारणे असे की सरकारने शिक्षणाचा अधिकार (आरटीई) ही योजना थांबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे खाजगी शाळांत शिकू पहाणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल वर्गातील मुलांना पुन्हा सरकारी शाळांमध्येच प्रवेश घ्यावा लागणार आहे.
सरकारने ही योजना रद्द करण्यामागे त्यांच्य शिक्षकांच्या कामाचा दर्जा सुधारला हे कारण असते तर हा शिक्षण हक्क कायदा रद्द झाल्याचे दु:ख झाले नसते. परंंतु खरे कारण असे आहे की या विशेष हक्कामुळे खाजगी शाळांतून प्रवेश देण्याचा झपाटा सुरु झाला आणि बघता-बघता सरकारवर 2400 कोटी रुपयांची थकबाकी निघाली. सहाजिकच असंख्य शाळांनी हे प्रवेश बंद केले आणि एक प्रकारे सरकारलाच नापास करुन टाकले. आपले अपयश झाकण्यासाठी सरकारने नवी क्लृप्ती लढवली. ती अशी की खाजगी शाळेच्या एक कि.मी. परिघात सरकारी शाळा असल्यास त्यांना आरटीईचा उपयोग करता येणार नाही. हा निर्णय जे पालक खाजगी शाळांत त्यांच्या पाल्यास दर्जेदार शिक्षण मिळेल या आशेवर होते त्यांचा हिरमोड होणार आहे. सरकारी भूमिकेत मात्र अशी मखलाशी आहे की सरकारी शाळांतील पटसंख्या वाढवण्यासाठी केलेली ही उपाययोजना आहे. आरटीई रद्द करताना सरकारी अथवा अनुदानित शाळांतील शिक्षक अधिक कार्यक्षमतेने आणि त्यांच्या खाजगी शाळांतील बांधवांप्रमाणे काम करुन मिळणाऱ्या भरघोस पगारास न्याय देतील. सरकार किती भाबडे असते किंवा किमान तसा आव आणते हे यावरून स्पष्ट होते. ते काही असले तरी शिक्षणासारख्या क्षेत्रात सरकारची ही धर-सोड वृत्ती सावळा गोंधळ घालत आहे, हे नक्की. कधी परीक्षा घेण्याचा निर्णय तर कधी मुलांच्या ‘बालमनावर’ अपयशाचा दुष्परिणाम होईल, असे थोतांड पंडीती शोध आपल्या तोंडावर मारुन शिक्षण खाते लाखो कोवळ्या जीवांशी खेळत असते. हे त्यांना कधी समजणार हे देवास ठाऊक.