अध्यात्मिक कॉरिडोर

देऊळ वा त्याच्या भोवतीच्या परिसराच्या नुतनीकरणाचे उद्घाटन यांना आपल्या देशात धार्मिक परिमाण लाभणे स्वाभाविक आहे. हा देश हिंदूंचा की हिंदुत्ववाद्यांचा यावरून राजकीय विश्वात चर्चा सुरूच असते आणि देवळासारख्या संवेदनशील विषयावरून निवडणुकीत मतांचा जोगवाही मागण्याची प्रथा असल्यामुळे काशी येथील कार्यक्रमाला त्याच पारड्यात तोलले जाईल असे, वाटत होते. किंबहुना भाजपा त्याचे राजकीय भांडवल करणार हे गृहीत धरले गेले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन समारंभात केलेले भाषण या विचाराला छेद देणारे ठरले. औरंगजेबसारख्या जुलमी शासकांनी भारताचा सांस्कृतिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे सांगून पंतप्रधानांनी काशीचे पवित्र शहर काळ्या पानांनी भरलेल्या इतिहासातून मुक्त करून नवा अध्याय लिहित आहे, असे म्हटले. शेकडो वर्षांच्या गुलामीचा प्रभाव आणि तिच्यामुळे आलेला न्युनगंड यातून बाहेर पडून एक नवा कॉरिडोर देशाला निर्णायक दिशा देईल, असा एक अनपेक्षित विचार मांडला. काशीच्या उद्घाटनाचे राजकीय भांडवल करताना धर्माचा वापर करणे मोदींनी शिताफीने टाळून त्याला सामाजिक परिमाण दिले. देश स्वतंत्र झाला तेव्हा भाकडा नांगर धरणाचे उद्घाटन करताना तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी असे विकास प्रकल्प आधुनिक देशाची नवीन तिर्थस्थाने असतील असा उदात्त विचार मांडला होता. श्री. मोदी यांनी भाजपाची विचारसरणी ध्यानात ठेऊन देवळांचे महत्त्व अबाधित ठेवताना त्यांना धर्मापलिकडे जाऊन दर्जा देण्याचा प्रयत्न केला. ‘कॉरिडर’ हा शब्द विकासाशी निगडीत असतो त्याचा खुबीने वापर करून धर्माला विकासाचे वेष्टन चढवले आहे. देशातील माणसांची (हिंदूंची) विकास-भावना धर्माधिष्ठिती रहावी हा एक नवा विचार त्यांनी शिताफिने पेरला आहे. हे पुरोगामी हिंदुत्व आगामी काळात पोथीनिष्ठ विचारसरणीला मागे टाकेल असा एक नवा आशावाद रूजवण्याचा प्रयत्न त्यात दिसतो.
धर्माची गोळी देऊन त्या अंमलाखाली रयतेला ठेवले तर अध्यात्मिक विकास होईलच असे नाही. परंतु अध्यात्मापेक्षा आज देशाला गरज आहे भौतिक विकासाची आणि तो साध्य करण्यासाठी माणसांची मानसिक सकारात्मक बनवावी लागेल. ही सकारात्मकता देवळाच्या दारावरून जात असेल तर बिघडले कुठे, हा नवा विचार या भाषणातून डोकावून गेला. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रकार आहे, असे राजकीय निरीक्षक मोदींच्या भाषणावर बोलतील. त्याला टीकेची छटा असली तरी पंतप्रधान यांना त्याची काळजी करण्यची गरज नाही. आपल्या मतपेढीला त्यांनी खूश केले आहे आणि विकास-पुरुष या प्रतिमेची काळजीही घेतली आहे. शेवटी ते मोदी आहेत, हे लक्षात घ्यायला हवे!