चांदीचा चमचा रोज नको

राजकारणातील घराणेशाहीबद्दल जनमानसात नापसंती असली तरी व्यक्तीपुजेचे उपजत संस्कार असणारे बहुसंख्य भारतीय निवडणुकीत मतदान करताना डोक्यापेक्षा हृदयाचाच वापर करतात. अन्यथा नेत्यांची मुले, सुना, जावई, नातवंडे, वगैरे निवडून येणे अशक्य होते. राजकीय घराण्यातील किमान १८ जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे घराणेशाहीविरुद्ध भाजपा नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेत तथ्य नव्हते असेच म्हणावे लागेल.
मंत्रिमंडळातील पुढील सदस्य हे पंतप्रधान मोदींबरोबर काम करण्याच्या किती लायकीचे आहेत हे यथावकाश समजेल. त्यापैकी कै. माधवराव शिंदे यांचे चिरंजीव ज्योर्तिआदित्य, वेदप्रकाश गोयल यांचा वारसा सांगणारे पियुष वगैरे दोन-चार मंत्र्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केलीही होती. परंतु अन्य मंत्र्यांना घराणेशाहीचा आधार घेत मिळालेला प्रवेश योग्य असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. त्यांच्यावर सरसकट वशिल्याचे तट्टू हा शिक्का मारणे अन्यायकारक ठरू शकेल. अर्थात वडील-आजोबा मंत्री होते म्हणून त्यांना प्राधान्य मिळाले हेही नाकारुन चालणार नाही.
माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी, किरेन रिजीजू, जयंत चौधरी, रक्षा खडसे, चिराग पासवान जे. पी. नड्डा, धर्मेंद्र प्रधान, जितीन प्रसाद आदींना संधी मिळाली असून त्यांना विशेष परिश्रम करुन आपली निवड योग्य होती हे दाखवून द्यावे लागणार आहे.
ज्या पद्धतीचा निकाल हाती आला तो पहाता भाजपा नेतृत्व मंत्रिमंडळ बनवताना जनतेच्या मनात पूर्वीसारखे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करील असे वाटले होते, स्वच्छ चारित्र्य, लोकाभिमुख कार्यपद्धती, संवादकौशल्य, जनतेशी संपर्क आणि सोपवण्यात आलेल्या जबाबदारीला न्याय देतील ही अपेक्षा रहाणार आहे. अशा वेळी खानदानाच्या पुण्याईपेक्षा कर्तृत्वाचा ठसा महत्त्वाचा ठरतो. घराणेशाही आणि कार्यक्षमता यांचा संबंध अलिकडच्या दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतल्या नेत्यांनी तोडलेला दिसतो. मतदारांनी अशा अनेकांना घरी बसवले आहे. त्यामुळे व्यक्तीपूजेचे महात्म्य कमी होत चालले आहे आणि रक्ताच्या नात्याबरोबर जनतेशी नाळ जोडण्याकडे पुढची पिढी प्रयत्नशील रहाताना दिसते.
या निवडणुकीत प्रस्थापितांविरुद्ध असलेला राग व्यक्त झाला. भले त्यामागे ध्रुवीकरणाचा मोठा वाटा आहे. परंतु प्रास्थापितांविरुद्ध होणारे मतदान केवळ जाती-पाती आणि धर्माच्या आधारे होत नसते. हा मुद्दा दुर्दैवाने मोठा ठरला हे मान्य केले तरी अकार्यक्षमतेलाही मतदारांनी शिक्षा दिली, हे मान्य करावे लागेल. घराणेशाहीमुळे मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या सदस्यांना 2024 च्या निवडणुकीत दुहेरी आव्हान पेलावे लागणार आहे. एक-प्रस्थापितांविरुद्ध धगधगणारा विरोध आणि त्यास जोडून घराणेशाहीबद्दल असलेली अढी. हे दुहेरी आव्हान उत्तम कामगिरी बजावूनच दूर होऊ शकते. त्यांनी एक लक्षात घ्यायला हवे की चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले तरी दररोज त्याच चमच्याने जेवणे तितकेसे शहाणपणाचे ठरणार नाही.