दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने अडवणूक होणाऱ्या शहरी भागातील प्रवासी नागरिकांना नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पांतर्गत अभयारण्यातील या वाघिणीचा हेवा वाटला तर नवल नाही! त्याचे असे झाले की उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात एका वाघिणीचा आणि तिच्या पाच बछड्यांचा रस्ता अडवला म्हणून पर्यटक वाहनचालकांविरुद्ध चक्क निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रकार असा होता की वाघीण आणि तिच्या बछड्यांची पर्यटकांच्या गाड्यांनी वाट रोखून धरली होती. वन्यप्राण्यांबाबत दाखवण्यात आलेल्या संवेदनांचे कौतुक करताना अशी भावना शहरी भागातील प्रशासन कधी बाळगेल असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावून गेला असेल तर तो उचितच समजायला हवा. सततच्या वाहतूक कोंडीत अनेक वाघ आणि वाघिणी तसेच शाळांत जाणारे बछडे अडकून पडत असतात. बेशिस्तपणे वाहन हाकणारे नियम धाब्यावर बसवून कोणताही सारासार विचार न करता कोंडीत भर घालत असतात. त्यांच्या बेमूर्वत वृत्तीमुळे ते स्वतःचे तर वेळ आणि इंधनाचे नुकसान करीत असतातच, परंतु अन्य वाहनांचा खोळंबा करीत असतात. अशा बेजबाबदार वाहनचालकांवर देखरेख ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात ठेवणे शक्य नसले तरी ‘सीसी’ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दोषी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलू शकतात. आपल्यावर कारवाई होणार नाही कारण आपला गुन्हा कोणाच्या लक्षातच येणार नाही, हा आत्मविश्वास शहरातील वाहतूक कोंडीस जबाबदार आहे.
वन्यप्राण्यांबाबत अनेक कायदे आहेत. त्यापैकी काही दोन पायांच्या प्राण्यांसाठी वापरले गेले तरी शहरांची जंगल-राजकडे सुरु झालेली वाटचाल थांबू शकेल. हतबल झालेल्या वाघिणीच्या आणि तिच्या बछड्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या वन अधिकाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. शल्य एकाच गोष्टीचे आहे की त्यांचा कित्ता परिवहन आणि वाहतूक विभागाचे अधिकारी अंमलात का आणत नाहीत याचे. जंगल-राज ही संज्ञा कायद्याविना चालणाऱ्या व्यवस्थेचे वर्णन करण्यासाठी वापरली जात असते. परंतु या जंगल-राजमध्ये जंगलचे कायदे स्वागतार्ह असतील तर जरूर जंगल-राज यावे. आपण त्याचे स्वागतच करू! कोंडी फोडण्याचा हा अक्सिर इलाज लवकरच अंमलात यावा ही अपेक्षा!!