भिंतीवरील घड्याळ शेजारीच लटकलेल्या कॅलेंडरशी बोलू लागले…
घड्याळ: तुझं बरं आहे, ३६५ दिवस संपले की तुझे या भूतलावरील इतिकार्य संपते. आमचं मात्र तसं नाही.
कॅलेंडर: म्हटलं तर तू म्हणतोस ते खरं आहे. पण खरं सांगू? चौकटीतलं जीवन जगून आम्हालाही कंटाळाच येत असतो.
घड्याळ: तू चौकटीचं बोलतोस, आम्ही तर गोलात फिरत राहतो अव्यहातपणे. २४ तासांच्या बंधनातून अर्थात वेळेच्या चक्रव्यूहातून आमची सुटका नसते.
कॅलेंडर: आमची मात्र वर्ष संपताच सुटका होते. पण शेवटी रद्दीवाल्याच्या दुकानातच रवानगी , हे प्रारब्ध काही चुकत नाही ! नवीन वर्षाच्या सुरुवातीस काय भाव असतो आम्हाला! कोरेकरितपण , गुळगुळीत कागदावर सप्तरंगी छपाई असा तो थाट काय वर्णवा!पण शेवटी-शेवटी अंगावर दुधाचा आणि इस्त्रीच्या कपड्यांच्या हिशेबांचा ‘टॅटो’नी आंग भरुन जाते!
घड्याळ: टॅटो’ची कल्पना गमतीदार वाटली. आमच्या नशिबी असं नटणं-बिटणं नाही. येता-जाता सर्वांच्या नजरा आमच्यावर. ‘बाप रे पुन्हा उशीर झाला. बॉसचा ओरडा बसणार’, असे उद्गार घर सोडताना चाकरमानी न चुकता ऐकणे जणु नित्याचे. त्यात खरं तर आमची काय चूक?
कॅलेंडर: आमच्या नशिबी मात्र फक्त एखादी महत्त्वाची तारीख शोधण्याच्या निमित्ताने घरातील सदस्यांशी भेट. एरव्ही आम्ही लटकत राहतो निवांत भिंतीवर. कोणी पाहो अथवा ना पाहो. क्वचित प्रसंगी वाऱ्यामुळे फडफड होते आमची. पण खरे सांगू का, अलिकडे आमचीही चिडचिड वाढली आहे.
घड्याळ: ती का रे भाऊ?
कॅलेन्डर: वेळ इतका वेगात धावतो की लोक सेकंदांचा विचार करतात पण दिवस-आठवडे वगैरे त्यांच्या खिचगणतीत नसतात. आम्ही कालबाह्य होणार की काय, अशी भीतीही दाटून येते. दोन दिवसांनी अमकं करायचे ठरवलं तर त्याला उशिर झालेला असतो तर पुढच्या आठवड्याची बातच काय? कोव्हिडमध्ये तर अख्खी दोन वर्षे गायब झाली होती…..कॅलेंडरवर कलणेच क्रूर घाला घालावा अशी स्थिती झाली आहे.
घड्याळ: पण साऱ्या गोष्टी थोडीच का सेकंदात होत असतात! नूडल्सलानाही दोन मिनिटे लागतात आणि नवीन जीव जन्माला यायला तर नऊ महिने ! तरी बरं, चार दिवस सासूचे, चार दिवस प्रेमाचे वगैरे नाटके तुला डोळ्यासमोर ठेऊनच लिहिली गेली असणार. आज पाहिली तारीख है, ‘हे गाणे विसरलास की काय?
कॅलेन्डर: तू उगाच मला शब्दांत अडकवून वेळ वाया घालवू नकोस. मला या महिन्याचा जीएसटी कधी भरायचा, वीजेचे बिल कधी अदा करायचे, चतुर्थी कधी आहे, ताईच्या लग्नाच्या वाढदिवशी काय करायचे, पुतण्याचे केळवण केव्हा करायचे, असे सारे ठरवायचे आहे. दिवस 30 आणि भानगडी 300 असे आयुष्य झाले आहे बघ आमचे.
घड्याळ: आमच्या आयुष्यात तर तारीखवार असे काही हॅपनिंग नसते. सकाळी दुधवाला आला की आम्ही समजायचे दिवस उजाडला आणि रात्री टी.व्ही. बंद झाला की आम्ही गुडुप अंधारात रात्र स्वीकारायची, काही वेळा आमची टिकटिकच आम्हाला कीटकीट वाटू लागते. काही दिवसांपूर्वी सेल संपल्यावर सर्व काटे शांतपणे एकमेकांशी बोलताना मी ऐकत होतो. खूप दिवसांनी सेकंद काट्याने त्याच्या आयुष्यातील धावपळीमुळे कशी दमछाक झाल्याचे सांगितले. मिनिटांचा आणि तासांचा काटा त्याला धीर देत होते.
कॅलेन्डर: तुझी व्यथा ऐकून मला माझं रटाळ, 12 पानी आयुष्य सुखकारक वाटू लागलंय. आंबट-गोड आठवणी माझ्या प्रत्येक रकान्यात साठून असतात हेच विसरलो आणि तसं पाहिलं गेलं तर आपण आहोत म्हणून तर माणसांत जगण्याची आशा असल्याचा विश्वास मिळत रहातो. आपली जागा भले भिंतीवर असेल पण प्रत्येक घरात अशी भिंत आहे म्हणून तर सर्व जग कसं टाईम-टू-टाईम चालतय!
घड्याळ: अगदी बरोबर. आता मीही तयारीला लागतो. आमच्या गॅगरी मालकांनी पार्टी ठेवली आहे. वर्षातून एकदाच या मध्यरात्रीची मी आतुरतेने वाट पहात असतो. फटाक्यांच्या आतषबाजीत,शुभेच्छांच्या जल्लोषात, मद्याच्या प्याल्यांच्या टकरा-टकरीत, सर्व जग माझ्याकडे डोळे भरून बघते. मलाही त्या क्षणी भरून पावल्यासारखं वाटतं! तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
कॅलेन्डर: मलाही रद्दीच्या दुकानापेक्षा कोणत्याही पुस्तकाचे कव्हर व्हायला आवडेल अशी शुभेच्छा देशील का?
जाता-जाता: भिंतीवर नवीन कॅलेन्डर लागेल. पण हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा हे ॠतु महिना बदलून आपल्या भेटायला येतील. माणूस मनमानी करू लागला तर हवामानात बदल होणारच ना!