घराणेशाही हरली आहे: मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका

ठाणे : बाळासाहेब होते तोपर्यंत सगळ्या गोष्टी नियमात होत्या, मात्र त्यानंतर मनमानी कारभार सुरू झाला, त्यानंतर असूया निर्माण झाली. अखेर सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते हे कालच्या निर्णयाने दाखवून दिले असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आहे तीच खरी शिवसेना आहे असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर दोन्ही गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या निकालानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन स्व.आनंद दिघे यांच्या तसबिरीपुढे नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, या निकालामुळे कालपासून सर्वत्र जल्लोष सुरू आहे. अखेर सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते हे कालच्या निर्णयाने दाखवून दिले. बाळासाहेब, दिघे साहेब यांच्या विचारांचा हा विजय झाला हे या निर्णयाने दाखवून दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे घराणेशाही हरली आहे अशी टीका देखील मुख्यमंत्र्यानी यावेळी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केली. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना मागितली, पण त्यांनी स्वतचे नाव पुढे केले, यावरून लक्षात आले त्यांना काय हवे ते. शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी मागण्याचे पाप देखील त्यांनी केले. त्यांना फक्त पैशाशी देणे-घेणे आहे, असा आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.

बहुमत असल्याचा कोणताही पुरावा ते देऊ शकले नाहीत. बाळासाहेबांनी काँग्रेसला विरोध केला, पण त्यांना यांनी मांडीवर घेतले. बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी तिलांजली दिली, मेरिटप्रमाणे निकाल लागावा, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते, आमच्याकडे विधानसभेत तसेच लोकसभेत बहुमत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

भरत गोगावले हे मुख्य व्हीप, शिवसेना आमची आणि आमच्या विचारांची, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. समोरच्या लोकांनी खोटे कागदपत्र दिल्याचे निकालात म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टात जायचा अधिकार सर्वांना
सुप्रीम कोर्टात जायचा अधिकार सर्वांना आहे. त्यांच्या बाजूने निकाल लागला तर ठीक नाहीतर सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले देण्याचे काम ते करतील असा टोला देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. कुठेही गेले तरी मेरिट आमच्या बाजूने आहे, त्यामुळे निकाल आमच्या बाजूने दिला. अध्यक्षांबाबत जे भाष्य त्यांनी केले ते खालच्या पातळीचे आहे. त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणार नाही, पण जनता नक्की उत्तर त्यांना देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.