दसरा-दिवाळीची रोषणाई; गोखले रोडला झळाळी

ठाणे : ठाण्यातील गोखले रोड विद्युत दिव्यांनी झगमगले की ठाण्याच्या बाजारपेठेला दिवाळीची चाहूल लागते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. दरवर्षी प्रमाणे शहरातील व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गोखले रोडवर दसऱ्याच्या निमित्ताने केलेली विद्युत रोषणाई दिवाळीच्या स्वागतासाठी आतुरली आहे. हा रस्ता खरेदी आणि रोषणाईच्या निमित्ताने ठाणेकरांचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे.

दिवाळीनिमित्त शहरातील अनेक रस्त्यांवर विद्युत रोषणाई केली जाते, कंदील लावून रस्ते सजवले जातात. गोखले रोडवर ही सजावट दसऱ्यापासूनच केली आहे. या रोषणाईमुळे हा परिसर सायंकाळी आणि रात्री उजळून निघत आहे, त्यामुळे बाजारपेठेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नौपाडा-गोखले रोड बाजारपेठ अनेक वर्षांपासून खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत असून विविध प्रकारच्या वस्तू ग्राहकांना येथे उपलब्ध होत आहेत. दिवाळीनिमित्त नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी करण्याकडे कल असतो. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहने, कपडे आणि सोने खरेदीला नागरिकांची अधिक पसंती असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी दरवर्षी सवलती देण्यात येत असतात. यंदाही ग्राहकांसाठी विशेष सवलती, नव्या वस्तूंचा संग्रह देण्यात येत असतात. यंदाही अनेक व्यापाऱ्यांनी ग्राहकांसाठी विशेष सवलती, नव्या वस्तूंचा संग्रह, सोन्याच्या पेढीत सोने-चांदीच्या घडणावळीत विशेष सूट, वाहन खरेदीवर सवलत घोषित करण्यात आली आहे.

यावेळी विविध ठिकाणी रांगोळी काढली जाईल तर लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम, संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या महोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली असून शुक्रवारपासून हा महोत्सव सुरू होणार असल्याचे ठाणे नौपाडा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मितेश शाह यांनी सांगितले.